टीम इंडिया आयपीएलच्या 18 व्या मोसमानंतर इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीची सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 11 ते 15 जून दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचा थरार रंगणार आहे. हा सामना क्रिकेटची पंढरी असलेल्या लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड येथे होणार आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्यासाठी आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबतची माहिती दिली आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण 3 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. दोन्ही संघांची ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील पहिली मालिका असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा या मालिकेत विजयाने सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच विंडीज आपल्या घरात ऑस्ट्रेलिया विरुद्ध कशी कामगिरी करते? याकडेही क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान दोन्ही संघ जवळपास दीड वर्षानंतर पुन्हा एकदा कसोटी मालिकेत आमनेसामने असणार आहेत. याआधी वेस्ट इंडीज जानेवारी 2024 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती. तेव्हा उभयसंघातील मालिका 1-1 ने बरोबरीत राहिली होती. ऑस्ट्रेलियाने विंडीजचा 10 विकेट्सने धुव्वा उडवत अप्रतिम सुरुवात केली होती. मात्र विंडीजने दुसऱ्या सामन्यात 8 धावांनी थरारक विजय मिळवला आणि पहिल्या पराभवाचा हिशोब चुकता केला होता.
पहिला सामना, 25 ते 29 जून, बार्बाडोस
दुसरा सामना, 3 ते 8 जुलै, (ठिकाण निश्चित नाही)
तिसरा सामना, 12 ते 16 जुलै, जमैका
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम : पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मॅट कुह्नेमन, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, मिचेल स्टार्क, ब्यू वेबस्टर आणि ब्रेंडन डॉगेट (राखीव).