पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी मंगळवारी रात्री उशिरा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. मानकर यांच्याविरुद्ध बनावट दस्त तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मानकर यांनी पक्षाकडे आपला राजीनामा सादर केला.
परदेशी तरुणीला आश्रय देण्याच्या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात शंतनू कुकडे याच्यासह आठ जणांविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. संबंधित आठ जणांना पोलिसांनी अटकही केली आहे.
दरम्यान, कुकडे याचा निकटवर्तीय रौनक जैन याच्या खात्यातून दीपक मानकर व त्यांच्या मुलाच्या बॅंक खात्यात पावणे दोन कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी केली होती.
दरम्यान, जैन, मानकर, कुकडे यांनी आर्थिक व्यवहार लपविण्यासाठी बनावट दस्त तयार केल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले होते. बनावट दस्त सादर करुन फसवणूक केल्याप्रकरणी जैन, कुकडे व मानकर या तिघांविरुद्ध फसवणूक, तसेच बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी सोमवारी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणावरून पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मानकर यांचा राजीनामा घेणार का ? यावर दोन दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर, मानकर यांनी मंगळवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पक्षाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा पाठविला.
याबाबत मानकर म्हणाले, 'मागील चार वर्षापूर्वी जैन याच्यासमवेत झालेल्या जमिनीचा व्यवहार झाला आहे, त्याबाबतची कागदपत्रे, कायदेशीर पुरावे आमच्याकडे असूनही पोलिसांनी माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणामुळे पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार व आमच्या पक्षाची विरोधकांकडून नाहक बदनामी होऊ नये, यादृष्टीने मी माझ्या शहराध्यक्ष पदाचा राजीनाम मंगळवारी पक्षाकडे सुपूर्द केला आहे.'