कर्तृत्व जोपासणारी 'कार्यशाळा'
esakal May 14, 2025 11:45 AM

डी. एस. कुलकर्णी - जीवन कौशल्य प्रशिक्षक

Education breeds confidence, Confidence breeds hope. Hope breeds peace. - Confucius.

या वाक्याचा प्रत्यय मला नुकताच आला. कोकणातील एका आडगावात मुक्काम करण्याचा योग नुकताच आला. एका छोट्या, होऊ घातलेल्या उद्योजकाची तिथेच ओळख झाली. मिहीर हे त्याचं नाव. वय १४-१५ वर्षे. आई-वडील उद्योजकीय मानसिकतेचे. कोकणमेव्याचा त्यांचा कौटुंबिक व्यवसाय. वडिलांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय. घरी आंबा, काजू वगैरेंची बाग. आम्ही मुक्काम केला, त्या कुटुंबाशी मिहीरचा कौंटुंबिक घरोबा. मिहीर आम्हाला त्याच्या व्यवसायस्थळी घेऊन गेला. गेल्या गेल्या त्यांच्या कारखान्यात तयार केलेल्या विविध सरबतांच्या बाटल्या त्याने आमच्यासमोर स्वागताप्रीत्यर्थ ठेवल्या. असं करायला त्याला कुणीही सांगितलं नव्हतं. मात्र, आपल्या छान स्वभावामुळे त्याने आमचा ताबाच घेतला होता. बोलता बोलता त्याने कारखाना दाखवला. त्याची आई होतीच सोबत. मात्र, भविष्यात ‘मलाच हे सगळे बघायचे आहे’, असाच काहीसा मिहीरचा वावर होता.

त्याला अभ्यासाबद्दल काही विचारण्याचा थोडा शहाणपणा मी केलाच. ‘‘अभ्यास करतोस का? किती गुण वगैरे?’’ असं विचारलं. त्यावर तो थोडा थांबला. त्याने विचार केला आणि नंतर त्याने फारच धाडसी विधान केलं. ‘‘मला अभ्यास करायला आवडत नाही, मला कारखान्यातच जास्त आवडतं’’, असं तो म्हणाला. मला अनुभवांती फारसा धक्का नाही बसला. कारण त्याने जवळ-जवळ चार हजारांची उत्पादने आम्हा सर्वांमध्ये विकली होती.

मिहीर शाळा, कॉलेज वगैरे शिकेलच. परंतु प्रत्यक्ष कारखाना आणि त्यासंबंधित इतरत्र ‘ऑन द जॉब ट्रेनिंग’ त्याला जे मिळेल, हेच त्याचे खरे शिक्षण असेल.

आपण स्वतः अंर्तबाह्य कसे आहोत? हे दाखवणाऱ्या आरशांचे रूपांतर विविध संधी उघडून देणाऱ्या खिडक्यांमध्ये करणे, हाच तर शिक्षणाचा एक हेतू आहे ना?

उद्योगपतीची गोष्ट

एक श्रीमंत उद्योगपती असतो. छान बंगला, नोकरचाकर. घराभोवती मस्त छान फुललेली बाग वगैरे. एका निवांत सकाळी बागेत फेरफटका मारताना, आपल्याच बागेची वैविध्यपूर्ण वैशिष्ट्ये त्या उद्योगपतीच्या लक्षात येतात. तो अतिशय प्रसन्न होतो. माळीबुवांना विचारतो, ‘‘ही सर्व झाडे अशी सुंदर, मस्त कशी काय बुवा बहरलीत? तुम्ही काय करता नेमके?’’ माळीबुवा शांतपणे उत्तर देतात की, ‘‘मी झाडांना उगवणे व वाढण्यासाठी बळजबरी नाही करत. मी फक्त त्यांना असे करण्यात अडचणी निर्माण करणारी परिस्थिती येणार नाही, याची काळजी घेतो.’’ मिहीरचे आईवडील, कदाचित त्याच्या शाळेतील शिक्षक या माळीबुवांचीच भूमिका पार पाडत असावेत.

बहरू द्या...

मला एकदम आठवले, हे ए.आय. नावाचे प्रकरण ‘दे माय धरणी ठाय’ करण्याची लक्षणे आतापासूनच दिसू लागली आहेत. अत्यंत वेगाने कृत्रिम बुद्धिमत्ता वेगवेगळ्या अंगांनी आपल्याभोवती जाळे विणू लागली आहे. या औद्योगिक क्रांतीला, अत्यंत ताकदीने सामोरे जायचे असेल, नव्हे जावेच लागेल, तर असे अनेक मिहीर फुलतील, बहरतील मानसिकदृष्ट्या सक्षम होतील आणि आर्थिकदृष्ट्या भक्कमही होतील. यासाठी त्यांच्या वाढीत निर्माण होणारे अडथळे कुशलतेने दूर करून योग्य ते वातावरण निर्माण करणारे अनेक माळीबुवा तयार व्हायला हवेत किंबहुना तशी सार्वजनिक मानसिकता तयार व्हायला हवी!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.