Navi Mumbai: नवी मुंबईत आज पाणीबाणी, कोण कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद?
Saam TV May 14, 2025 02:45 PM

Water Supply Shutdown in Navi Mumbai: नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीवरील अग्रोळी पुलाजवळील रेल्वे ट्रॅकशेजारी आणि शिखले गावाजवळील पुलाखालील जलवाहिनीतून सातत्याने पाणीगळती होत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सदर जलवाहिनी बदलण्याचे काम बुधवारी करण्यात येणार आहे. या दुरुस्तीमुळे भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रावरून नवी मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा आजपासून गुरुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे.

यामुळे क्षेत्रातील बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली तसेच कामोठे आणि खारघर या विभागांमध्ये १४ आणि १५ मे रोजी दिवसभर पाणीपुरवठा होणार नाही. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल. नागरिकांना या कालावधीत पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि आवश्यक ती व्यवस्था करावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. पाणीगळतीमुळे होणारा पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत असून, नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंती महापालिकेने केली आहे.

रत्नागिरीत आता आठवड्यातून एक दिवस पाणी कपात

शहराला आता आठवड्यातून एकदा पाणी कपात करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात गतवर्षीच्या तुलनेत १५० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जास्त आहे. उपलब्ध पाणीसाठा १० जूनपर्यंत पुरेल इतका आहे. तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने होत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सध्या तरी आठवड्यातून एकदाच दर सोमवारी पाणी कपात सुरू करण्यात आलीय. रत्नागिरी शहराला दररोज १८ ते १९ दशलक्ष घनमीटर पाणी पुरवठा केला जातो. शहरातील प्रत्येक प्रभागात दररोज दीड तास पाणीपुरवठा केला जातो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.