Pune Accident: नाकाबंदीवेळी ट्रक अडवून इंजिन बंद केलं, 'ट्रकवाल्यानं वाहतूक पोलिसालाच चिरडलं', वाढदिवसाच्या आदल्या रात्रीच मृत्यू..
esakal May 14, 2025 05:45 PM

गणेश बोरुडे

तळेगाव स्टेशन : मुंबई-पुणे महामार्गावर छत्रपती संभाजी महाराज चौकात चाकण फाट्यावर पोलीस नाकाबंदी चालू असताना मंगळवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास एका ट्रकने कर्तव्यावरील पोलीसाला चिरडले. मिथून धेंडे (४१,उरुळी कांचन,पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. अपघातानंतर ट्रकचालक चाकण एमआयडीसीतील वाहनतळावर ट्रक पार्किंग करुन फरार झाला.

एक ट्रकचालक मुंबई पुणे महामार्गावरून बेदकार गाडी चालवत असल्याबाबत एका दुचाकीस्वाराचा ११२ आपत्कालीन क्रमांकावर फोन आला. त्यानुसार वडगाव मावळ पोलिसांकडून तत्काळ चाकण फाट्यावर नाकाबंदी लावून वाहनांची तपासणी चालू होती. सदर एचआर-७४ बी-३६७७ क्रमांकाचा ट्रक दृष्टीक्षेपात येताच वाहतूक नियंत्रण विभागाचे कर्तव्यावरील पोलीस अंमलदार मिथून धेंडे यांच्यासह वाहतूक सहायक सुतार यांनी तो ट्रक अडवून गाडीचे इंजिन बंद केले. मात्र, धेंडे यांनी बॅरिकेड लावण्याचा इशारा करताच ट्रकचालकाने अचानक ट्रक चालू करुन चाकण दिशेने वेगाने पळवला.

दरम्यान समोर उभे असलेले मिथून धेंडे यांना ट्रकने चिरडले. पोटावरुन ट्रकचे चाक गेल्याने गंभीर जखमी झालेल्या धेंडे यांना सोमाटणे येथील पवना हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र,उपचारापुर्वीच धेंडे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.पुणे ग्रामीण पोलिसांनी त्वरित चाकण बाजूला नाकाबंदी आदेश दिले.

मात्र, ट्रकचालक नाकाबंदी हुकवत चाकण एमआयडीसीतील एचपी चौकालगच्या वाहन तळावर ट्रक पार्क करुन फरार झाला. दरम्यान घटनेची माहीती समजताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळ आणि पवना हॉस्पीटल येथे भेट देऊन माहिती घेतली.

रात्री दोन वाजता धेंडे यांचा मृतदेह तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मुळच्या उरुळी कांचन येथील असलेल्या मयत मिथून धेंडे यांच्या पश्चात पत्नी,.मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार परिवार असून धेंडे हे वडगाव मावळ पोलीस ठाण्यात मनमिळाऊ कर्मचारी म्हणून सर्वश्रुत होते. १४ मे हा धेंडे यांचा वाढदिवस होता. मात्र आदल्या दिवशी रात्रीच त्याना मृत्यूने गाठले. याबद्दल पोलिस दल तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.अपघातातील ट्रक वडगाव मावळ पोलिसांनी ताब्यात घेतला असून,चालक आणि त्याचा एक साथीदार फरार आहेत.पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.