SSC Results 2025 : दहावीमध्ये कोकणचीच पोरं लई हुशार,राज्यात ९४.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; निकाल १.७१ टक्क्यांनी घसरला
esakal May 14, 2025 02:45 PM

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत ९४.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील नऊ विभागीय मंडळातून १५ लाख ४६ हजार ५७९ नियमित विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल ९८.८२ टक्के असा सर्वाधिक असून, सर्वांत कमी निकाल नागपूर विभागाचा ९०.७८ टक्के आहे. बारावीप्रमाणेच दहावीचा निकालही यंदा घसरला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल १.७१ टक्क्यांनी कमी झाला आहे.

राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ५८ हजार २० नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४ असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.३१ आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८३ ने जास्त आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ उपस्थित होते.

राज्यातील २३ हजार ४८९ माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक ९९.३२ टक्के, तर गडचिरोली जिल्ह्याचा निकाल सर्वांत कमी ८२.६७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी चार ८८ हजार ७४५ विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत, चार लाख ९७ हजार २७७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तीन लाख ६० हजार ६३० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, एक लाख आठ हजार ७८१ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

पुरवणी परीक्षा २४ जूनपासून होणार सुरू

दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा २४ जूनपासून सुरु होणार आहे, ही परीक्षा १६ जुलैपर्यंत सुरू असेल. या परीक्षेचा निकाल जुलैच्या अखेरीस जाहीर होणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

पुणे - ९४.८१

नागपूर - ९०.७८

छत्रपती संभाजीनगर - ९२.८२

मुंबई - ९५.८४

कोल्हापूर - ९६.८७

अमरावती -९२.९५

नाशिक- ९३.०४

लातूर - ९२.७७

कोकण - ९८.८२

‘सीबीएसई’च्या निकालात किंचित वाढ

कें द्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत ९३.६६ टक्के, तर बारावीच्या परीक्षेत ८८.३९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सीबीएसईच्या दहावीच्या निकालात ०.०६ टक्क्यांनी, तर बारावीचा निकालात ०.४१ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

सीबीएसईची दहावी-बारावीची परीक्षा दिलेले लाखो विद्यार्थी दोन दिवसांपासून परीक्षेचा निकाल जाहीर होणार, या प्रतीक्षेत होते; परंतु सीबीएसईने यंदाही नेहमीप्रमाणे कोणतीही पूर्व सूचना न देता अचानकपणे मंगळवारी सुरुवातीला बारावी आणि नंतर दहावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला. सीबीएसईतर्फे बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते ४ एप्रिल, तर दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान घेण्यात आली होती.देशातील सात हजार ३३० केंद्रांवर बारावीची परीक्षा झाली. एकूण १९ हजार २९९ उच्च माध्यमिक शाळांमधून तब्बल १७ लाख चार हजार ३६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १६ लाख ९२ हजार ७९४ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली, त्यापैकी १४ लाख ९६ हजार ३०७ विद्यार्थी (८८.३९ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या परीक्षेसाठी २६ हजार ६७५ शाळांमधून २३ लाख ८५ हजार ७९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील २३ लाख ७१ हजार ९३९ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली, त्यातील २२ लाख २१ हजार ६३६ विद्यार्थी (९३.६६ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत.

पुणे विभागाचा दहावीचा ९६.५४ टक्के; तर बारावीचा ९०.९३ टक्के निकाल

सीबीएसईच्या पुणे विभागात महाराष्ट्र, गोवा, दीव-दमण, दादरा आणि नगर हवेली समाविष्ट आहे. त्यानुसार पुणे विभागातील दहावीची परीक्षा दिलेले ९६.५४ टक्के विद्यार्थी, तर बारावीचे ९०.९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

महाराष्ट्रातील निकालाची आकडेवारी

तपशील : नोंदणी केलेले विद्यार्थी : परीक्षा दिलेले विद्यार्थी : उत्तीर्ण झालेले विद्यार्थी : उत्तीर्णतेची टक्केवारी

दहावी : १,१७,५३१ : १,१७,२३७ : १,१३,२५७ : ९६.६१

बारावी : ३४,८७४ : ३४,७०३ : ३१,४६८ : ९०.६८

सीबीएसईच्या परीक्षेत नव्वदीपार विद्यार्थी

तपशील : दहावी : बारावी

९५ टक्के आणि त्याहून अधिक गुण : ४५,५१६ : २४,८६७

९० टक्के आणि त्याहून अधिक गुण : १,९९,९४४ : १,११,५४४

दहावी-बारावीच्या निकालातील विद्यार्थ्यांची आकडेवारी

तपशील : दहावी : बारावी

नोंदणी केलेले विद्यार्थी : २३,८५,०७९ : १७,०४,३६७

परीक्षा दिलेले विद्यार्थी : २३,७१,९३९ : १६,९२,७९४

उत्तीर्ण विद्यार्थी : २२,२१,६३६ : १४,९६,३०७

उत्तीर्णतेची टक्केवारी : ९३.६६ टक्के : ८८.३९ टक्के

परदेशातील शाळांमधील निकाल

इयत्ता : नोंदणी केलेले : परीक्षा दिलेले : उत्तीर्ण झालेले : उत्तीर्णतेची टक्केवारी

बारावी : २१,८२५ : २१,७८२ : २०,६९४ : ९५.०१ टक्के

दहावी : २९,८४७ : २९,७४५ : २९,३२० : ९८.५७ टक्के

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.