नाशिक - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संदर्भात शिवसेना (ठाकरे) आजही सकारात्मक आहे. फक्त त्यांनी महाराष्ट्र द्रोह्यांशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नये, अशी भूमिका मांडताना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राऊत नाशिक व मालेगाव दौऱ्यावर आले होते. ते म्हणाले, ‘मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत आम्ही आजही सकारात्मक आहोत. राष्ट्रवादी फोडण्याआधीपासूनच भाजपने सर्व योजना तयार केली होती.
त्यामुळेच अजित पवार यांच्या गटातील प्रफुल्ल पटेलांकडे दिल्लीची जबाबदारी सोपविली आहे. मग विलीनीकरण करताना सुप्रिया सुळे यांच्याकडे कोणती जबाबदारी असेल,’ असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला.
चंद्रचूडांकडून निराशा, गवईंकडून आशा
सरन्यायाधीश भूषण गवई सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने त्यांच्याकडून महाराष्ट्राला न्याय मिळेल, माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनी महाराष्ट्राची निराशा केल्याचे मत राऊत यांनी व्यक्त केले. महायुतीतील अजित पवार गट आणि शिंदे गट हे पक्ष नसून केवळ गट आहेत. यामुळे त्यांचा पक्ष म्हणून जन्म कधीच होणार नाही, असे सांगत पक्ष फोडाफोडी न करता स्वत:चा पक्ष काढणारे राज ठाकरे आणि नारायण राणे यांचे राऊतांनी कौतुक केले.