आयपीएलचा 18 वा मोसम भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे 9 मे रोजी एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आला होता. मात्र परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर बीसीसीआयने 12 मे रोजी सुधारित वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार आता 17 मे ते 3 जून दरम्यान उर्वरित 17 सामने खेळवण्यात येणार आहे. मात्र आता दोन्ही देशांमधील स्थितीनंतर मायदेशी परतलेले काही विदेशी खेळाडू पुन्हा भारतात परतणार नसल्याचं म्हटलं जात आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल महामुकाबला होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांचे बहुंताश खेळाडू भारतात येणार नाहीत.
तसेच जोफ्रा आर्चर, जेमी ओव्हरटन आणि सॅम करन हे तिघे भारतात येणार नाहीत. जेमी ओव्हरटन आणि सॅम करन हे दोघे चेन्नई सुपर किंग्सचं प्रतिनिधित्व करत होते. तर जोफ्रा आर्चर राजस्थान रॉयल्सकडून खेळत होता. चेन्नई आणि राजस्थान दोन्ही संघ अधिकृतरित्या प्लेऑफमधून बाहेर झाले आहेत. त्यामुळे हे खेळाडू परत न येण्याने तसा काही फरक पडत नाही.
दुसऱ्या बाजूला प्लेऑफच्या शर्यतीत असलेल्या आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स टीमसाठी दिलासादायक बाब आहे. जोस बटलर, विल जॅक्स, लियाम लिविंगस्टोन आणि जेकब बेथल 15 मे पर्यंत भारतात परतणार असल्याचं म्हटलं जात आहे. विल जॅक्स मुंबई इंडियन्सच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. तर जेकब बेथल आणि लियाम लिविंगस्टोन आरसीबीचा भाग आहेत. जोस बटलर गुजरात टायटन्सकडून खेळतोय. गुजरातही प्लेऑफच्या उंबरठ्यावर आहे.
फिल सॉल्ट परतणार की नाही? याबाबत कोणतीच अपडेट नाही. फिल सॉल्ट आरसीबीकडून खेळत होता. मात्र सॉल्टला 18 वा हंगाम स्थगित होण्याआधी दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्या जागी जेकब बेथल याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देणयात येत होती. त्यामुळे आता सॉल्ट येणार की नाही? याबाबत काहीच स्पष्टता नाही. जोफ्रा आर्चर दुखापतीतून सावरतोय. त्यामुळे तो येणार की नाही? याकडे राजस्थान रॉयल्सची करडी नजर असणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा ऑलराउंडर मोईन अली येणार की नाही? हे देखील स्पष्ट नाही. “मोईन भारतात परतण्याबाबत काही तासांमध्ये निर्णय घेईल”, असं ऑलराउंडरचे वडील मुनीर अली याने एका वेबसाईटला सांगितलं.