आग लागलेली बस १ किमी धावली, ड्रायव्हर उडी मारून पळाला, प्रवाशी होरपळले; ५ जणांचा मृत्यू
esakal May 15, 2025 01:45 PM

धावत्या बसला आग लागून ५ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना लखनऊत घडलीय. बसला आग लागताच चालक आणि वाहकाने उडी मारली. त्यानंतर बस जवळपास एक किलोमीटरपर्यंत धावत होती. बसमधील बहुतांश प्रवासी झोपेत असल्यानं आग लागल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही. जेव्हा कळालं तेव्हा खूप उशीर झाला होता. या घटनेत ३ मुलांसह एक महिला आणि पुरुषाचा मृत्यू झाला आहे. सर्वजण बिहारचे असून ते दिल्लीला निघाले होते.

कल्ली पश्चिम इथं असलेल्या किसानपथवर गुरुवारी पहाटे बसला आग लागली. बसमध्ये अचानक आग लागल्यानं प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला. काही क्षणात बसमध्ये आगीनं रौद्ररूप धारण केलं. बसमध्ये बसलेल्या काही प्रवाशांनी दरवाजा तोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण खिडक्यांना लोखंडी रॉड असल्यानं त्यांना बाहेर पडता आलं नाही.

रस्त्यावरून जाणाऱ्या इतर प्रवाशांनी या घटनेची माहिती पोलिसांनीन दिली. यानंतर घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासन दाखल झाले. अग्नितांडवात पाच जणांचा होरपळूम मृत्यू झाला. अनेक लोक आगीच्या ज्वाळांमध्ये होरपळत होते. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणून जखमी झालेल्यांना रुग्णालयात पाठवलं आहे. तर मृतदेहांचे शवविच्छेदन केले जात आहे.

वाचलेल्या प्रवाशांनी सांगितलं की, बरेचसे प्रवासी झोपेत होते. आरडाओरडा होताच जाग आली तेव्हा बसमध्ये धूर दिसत होता. यामुळे प्रवासी घाबरले आणि गोंधळ उडाला होता. सकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. एका प्रवाशाने सांगितलं की, गिअरजवळ स्पार्क झाल्यानंतर आग भडकली. चालक कुणालाच न सांगता पळून गेला. पुढचे प्रवासे कसेबसे निघाले पण मागचे लोक अडकले.

बस दुर्घटनेत बालक राम नावाच्या व्यक्तीच्या मुलांचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत सात महिन्याची गर्भवती असलेली पत्नी होती. आगीच्या घटनेनंतर त्यानं पत्नीला खाली उतरवलं. तेव्हा मुलं झोपेत होती आणि पत्नीला काढल्यानंतर मुलांना खाली उतरवता आलं नाही. त्यांचा झोपेतच होरपळून मृत्यू झाला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.