दहशतवादाविरोधात भारताकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं जात असतानाच पाकिस्तानमधील एका जागेचं नाव सध्या जागतिक माध्यमांमध्ये ट्रेंड होऊ लागलं आहे. सोशल मीडियावरही त्याची जोरदार चर्चा आहे. हे नाव आहे ‘किराना हिल्स’. गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला हे नाव सतत ऐकायला मिळालं असेल. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात खोलवर वसलेलं आणि फारसं स्पष्ट नसलेलं हे ठिकाण ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. पाकिस्तानकडून झालेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने जोरदार हवाई हल्ले केले. जवळपास तीन तास सुरू असलेल्या या हल्ल्यात भारतीय हवाई दलाने (IAF) 11 पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त केले. पाकिस्तान हवाई दलाला (PAF) आधार देणाऱ्या सुमारे 20 टक्के पायाभूत सुविधा नष्ट केल्याची माहिती समोर आली. या हल्ल्यांचे फोटो आणि लष्करी कारवाईबद्दलची माहिती बातम्यांमध्ये पसरत असताना सोशल मीडियावर ‘किराना हिल्स’ या जागेविषयी कुजबुज अधिकच वाढली. पाकिस्तानमधील अण्वस्त्र साठा असलेल्या ‘किराना हिल्स’ला भारताने लक्ष्य केलं का, असा सवाल सतत विचारला जात आहे.
पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील सरगोधा जिल्ह्यात स्थित किराना हिल्सविषयी लष्करी आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये बऱ्याच काळापासून दबक्या आवाजात चर्चा होती. ‘पाकिस्तानचा एरिया 51’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खडकाळ टेकड्यांमध्ये 1980 च्या दशकात भूमिगत बोगदे आणि मजबूत बंकर बांधल्याचं म्हटलं जातं. यामध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्र शस्त्रागाराचे प्रमुख घटक- वॉरहेड्स, डिलिव्हरी सिस्टम आणि संवेदनशील क्षेपणास्त्र तंत्रज्ञान असल्याचं सांगितलं जातं. पाकिस्तानने कधीच या जागेचं खरं स्वरुप सार्वजनिकरित्या मान्य केलेलं नाही. ओपन-सोर्स इंटेलिजन्समध्येही त्याचे संदर्भ केवळ काल्पनिकच राहतात. परंतु उच्च-स्तरीय लष्करी कारवाईदरम्यान ही जागा सार्वजनिक संभाषणात चर्चेत आल्याने त्याचं मूल्य पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
‘किराना हिल्स’विषयी सोशल मीडियावर चर्चा असतानाच भारतीय हवाई दलाने त्यावर आपलं मौन सोडलंय. “आम्ही किराना हिल्सवर हल्ला केला नाही”, असं एअर मार्शल ए. के. भारती यांनी सोमवारी 12 मे रोजी झालेल्या तिन्ही सैन्यदलांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केलं. याविषयी जागतिक माध्यमं आणि डिफेन्स कम्युनिटीमध्ये पसरलेल्या अफवांचं स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, “पाकिस्तानने किराना हिल्समध्ये आपली अण्वस्त्रे साठवल्याचं आम्हाला सांगितल्याबद्दल धन्यवाद, जे काही असेल ते. आम्ही किराना हिल्सवर हल्ला केला नाही. आम्ही तुम्हाला सांगितलेल्या कारवायांच्या यादीत ते नव्हतं.” पत्रकाराला उत्तर देताना भारती यांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्याला सोशल मीडियाने अचूक हेरलं आणि त्यावरून चर्चा सुरू केली.
‘किराना हिल्स’वरील हल्ल्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांना जरी ए. के. भारती यांनी नाकारलं असलं तरी त्यांच्या वक्तव्यातून दोन गोष्टी अधोरेखित होतात. पहिलं म्हणजे, किराना हिल्स हे पाकिस्तानच्या अण्वस्त्रांच्या पायाभूत सुविधांमध्ये एक महत्त्वाचा केंद्र असल्याचं किमान अनौपचारिकरित्या स्वीकारलं गेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, भारताची क्षमता असूनही जाणूनबुजून त्याठिकाणी लक्ष्य करणं टाळलं आहे. तरीसुद्धा सोशल मीडियावर अशी जोरदार चर्चा आहे की भारतीय क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात किराना हिल्स परिसरावर आघात झाला होता, ज्यामुळे कदाचित भूगर्भात हादरे बसले असतील. भारताच्या हल्ल्यामुळे त्याठिकाणी न्युक्लिअर फॅसिलिटीला धक्का पोहोचल्यानेच या प्रदेशात भूकंपाचे सौम्य हादरे बसले, असाही अंदाज काहींनी वर्तवला आहे.
22 एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांचे प्राण घेतले. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने 7 मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारताच्या या हवाई हल्ल्याने बिथरलेल्या पाकिस्तानने मोर्टार शेल, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी भारतीय लष्करी आणि नागरी क्षेत्रांवर हल्ला केला. आपल्या प्रत्युत्तरात भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या आत खोलवर 11 लष्करी स्थळांवर हल्ले केले. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार रफीकी, मुरीद, नूर खान, रहीम यार खान, सुक्कुर, चुनियान, पसरूर आणि सियालकोटमधील महत्त्वाच्या हवाई तळांवर भारताने हल्ले केले. पाकिस्तानच्या लष्करी आस्थापनेचं मुख्यालय असलेल्या रावळपिंडीजवळील चकलाला इथल्या नूर खान एअरबेसवरील हल्ल्याचं यात विशेष महत्त्व होतं. पाकिस्तानच्या मुख्य वाहतूक पथकांसाठी आणि लॉजिस्टिक, स्ट्रॅटेजिक एअरलिफ्ट ऑपरेशन्ससाठी हे एअरबेस महत्त्वाचं होतं.
गंभीर बाब म्हणजे, नूर खान हे पाकिस्तानच्या अण्वस्त्र शस्त्रागारांवर देखरेख करणारी संस्था ‘स्ट्रॅटेजिक प्लॅन डिव्हिजन’च्या मुख्यालयाजवळ आहे. न्यूयॉर्क टाइम्सने पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमाशी परिचित असलेल्या एका माजी अमेरिकन अधिकाऱ्याचा हवाला देत म्हटलं, “आपल्या अण्वस्त्र कमांड अथॉरिटीचा शिरच्छेद केला जाईल अशी पाकिस्तानला सर्वांत जास्त भीती आहे. भारत अशा ठिकाणी हल्ला करू शकतो असा थेट इशारा नूर खान एअर बेसवरील क्षेपणास्त्र हल्ल्यातून दिल्याचा अर्थ यातून लावला जाऊ शकतो.” सॅटेलाइट प्रतिमांमध्ये सरगोधा इथल्या मुशफ एअरबेसच्या धावपट्टीवर हल्ला झाल्याचेही संकेत मिळाले आहेत. हा तळ किराना हिल्सच्या खाली असलेल्या भूमिगत अण्वस्त्र साठवणुकीच्या ठिकाणांशी जोडलेला असल्याचं वृत्त आहे. त्यावरच अनेक भेदक शस्त्रास्त्रांचा हल्ला झाला आहे.
फ्लाइट-ट्रॅकिंग करणाऱ्यांना जेव्हा पाकिस्तानी हवाई क्षेत्रात अणु आपत्कालीन प्रतिसादासाठी प्रसिद्ध असलेलं अमेरिकन विमान B350 AMS असल्याचं दिसलं, तेव्हा याची चर्चा अधिक तीव्रतेने होऊ लागली. काहींनी याचा अर्थ रेडिओएक्टिव्ह गळतीचं लक्षण म्हणून लावला. तर काहींनी किराना हिल्सअंतर्गत असलेल्या अण्वस्त्र शस्त्रसाठ्याला किती नुकसान झालं किंवा ते नियंत्रणात आणायला मदत करण्यासाठी इजिप्शियन विमान आल्याचंही म्हटलंय. परंतु पाकिस्तान किंवा अमेरिकेनं विमानाच्या उपस्थितीवर अधिकृतपणे भाष्य केलं नाही. पाकिस्तानी संरक्षण अधिकाऱ्यांनी हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. आमच्या कोणत्याही अणु सुविधांना लक्ष्य केलं गेलं नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय. परंतु किराना हिल्सबद्दल त्यांनी मौन बाळगल्याने चर्चांना आणखी उधाण आलं आहे.
नूर खान आणि सरगोधा इथल्या हल्ल्यांचा उद्देश संघर्ष आणखी वाढल्यास पाकिस्तानच्या अण्वस्त्रांना निष्क्रिय करण्याची भारताची क्षमता दर्शविण्याचा होता. पाकिस्तानने भारताविरुद्ध आपल्या अण्वस्त्र स्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. अण्वस्त्रांच्या बाबतीत भारत प्रथम वापर न करण्याचं धोरण पाळतो. परंतु पाकिस्तानकडे संयमाचं असं कोणतंही जाहीर धोरण नाही. किराना हिल्स परिसराच्या ऑनलाइन नकाशावर नजर टाकल्यास, टेकड्यांच्या तपकिरी आणि हिरव्या रंगात बांधकामाचा थर दिसून येतो. किराना हिल्स हा परिसर मोक्याच्या ठिकाणी आहे. ते सरगोधा एअरबेसपासून रस्त्याने फक्त 20 किलोमीटर अंतरावर आणि कुशाब अणुऊर्जा प्रकल्पापासून 75 किमी अंतरावर आहे.
किराना हिल्स हे एक लष्करीदृष्ट्या अत्यंत मजबूत क्षेत्र आहे. तिथे भूमिगत आण्विक पायाभूत सुविधा असल्याचं, कर्नल विनायक भट (निवृत्त) यांनी नोव्हेंबर 2017 मध्ये ‘द प्रिंट’ या वृत्तपत्रातील लेखात म्हटलं होतं. सुमारे 68 चौरस किमी क्षेत्रफळात व्यापलेलं आणि 39 किमी परिघाने वेढलेलं किराना हिल्स ही बहुस्तरीय संरक्षण प्रणालीने डिझाइन केलेली आहे.
संवेदनशील लष्करी पायाभूत सुविधांच्या विकासाचं काम सोपवण्यात आलेल्या अभियांत्रिकी शाखेनं पाकिस्तानच्या स्पेशल वर्क्स डेव्हलपमेंट (SWD) युनिटने किमान 10 मजबूत बोगदे बांधले आहेत. उच्च-प्रभावी स्फोटांना तोंड देण्याच्या दृष्टीने यांची रचना केली आहे. हे बोगदे थर्मो-मेकॅनिकने प्रक्रिया केलेल्या लोखंडी रॉडने मजबूत केले जातात. असं असलं तरी आधुनिक काळातील हवाई दलांकडे खोलवर प्रवेश करणारी शस्त्रे आहेत, जी भूगर्भातील ठिकाणांना लक्ष्य करण्यास सक्षम आहेत, असं एका अनुभवी सैनिकाने म्हटलंय. त्यामुळे किराना हिल्स या जागेची गुप्तता आणि सुरक्षा ही पाकिस्तानसाठी अधिक महत्त्वाची आहे.
नूर खान आणि सरगोधा एअरबेसवरील हल्ल्यांमुळे अशी चर्चा सुरू झाली आहे की भारतीय हवाई दलाने किराना हिल्सवर एक संकेतात्मक हल्ला केला असावा जेणेकरून पाकिस्तानला हे कळेल की आपल्या सैन्याला सर्वकाही माहीत आहेच. शिवाय पाकिस्तानात कुठेही हल्ला करण्याची आपली क्षमता आहे, हेसुद्धा अधोरेखित करायचं होतं. परंतु एअर मार्शल ए. के. भारती यांनी किराना हिल्सवर भारताने कोणताच हल्ला केला नसल्याचं म्हटलंय. याबद्दल सांगताना मात्र त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्याने सर्वांचं लक्ष वेधलं.