टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 अंतिम फेरीची संधी हुकली, पण तरीही झाली आयसीसीची कृपा
GH News May 15, 2025 07:13 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने आहेत. आता क्रिकेटविश्वाला नवा विजेता मिळतो की ऑस्ट्रेलिया सलग दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला जवळपास 30 कोटी, तर उपविजेत्या संघाला 18 कोटी रुपये मिळणार आहे. भारताची जेतेपदाची संधी दोन वेळा हुकली होती. तसेच तिसऱ्यांदा अंतिम फेरीत स्थान मिळवण्याचं स्वप्न भंगलं. भारताने मायदेशी न्यूझीलंडविरुद्धची मालिका 3-0 आणि बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत 3-1 पराभवाचं तोंड पाहिल्याने ही संधी हुकली. भारताची विजयी टक्केवारी ही 50 असून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. असं असलं तरी आयसीसीकडून टीम इंडियाला बक्षिसी रक्कम मिळणार आहे. आयसीसाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिप स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक खेळआडूसाठी बक्षिसी रक्कम जाहीर केली आहे. भारत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी असल्याने फायदा झाला आहे. कारण भारताला बक्षिसाच्या रुपाने 1.4 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच 12 कोटी 32 लाख रुपये मिळणार आहेत. त्यामुळे भारताने अंतिम फेरी गाठली नसली तरी 12 कोटी 32 लाख रुपये मिळाले आहेत.

पाकिस्तानसह इतर संघांना किती बक्षिसी रक्कम मिळणार?

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंड संघाला 1.2 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच 10 कोटी 26 लाख रुपये मिळणार आहेत. पाचव्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंड संघाला 9 लाख 60 हजार अमेरिकन डॉलर, सहाव्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंकेला 8 लाख 40 हजार अमेरिकन डॉलर, सातव्या क्रमांकावर असलेल्या बांगलादेशला 7 लाख 20 हजार अमेरिकन डॉलर, आठव्या क्रमांकावर असलेल्या वेस्ट इंडिज संघाला 6 लाख अमेरिकन डॉलर्स मिळणार आहे. सर्वात शेवटी म्हणजेच तळाशी असलेल्या पाकिस्तान संघाला 4 लाख 80 हजार अमेरिकन डॉलर्स मिळणार आहेत.

काय म्हणाला पॅट कमिन्स आणि टेम्बा बावुमा?

ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला की, ‘विश्व कसोटी अजिंक्यपदाचे रक्षण करण्याची संधी मिळाल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे , विशेषतः लॉर्ड्सवर. गेल्या दोन वर्षांत अंतिम फेरी गाठण्यासाठी अविश्वसनीय परिश्रम करणाऱ्या सर्व खेळाडूंना हे एक प्रमाणपत्र आहे, जे आपल्या सर्वांसाठी एक मोठा सन्मान आहे.’ तर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा म्हणाला की, ‘आम्हाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा खरोखर आनंद आहे. आमच्यासाठी आयसीसी जेतेपद जिंकण्याची एक चांगली संधी आहे.’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.