IPL 2025 : प्लेऑफमध्ये कोण पोहचणार? टॉप 4 साठी जोरदार चुरस
GH News May 15, 2025 07:13 PM

भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धविरामानंतर आता पुन्हा एकदा आयपीएलच्या 18 व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत कारवाई करत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. मात्र त्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला. त्यामुळे बीसीसीआयकडून खबरदारी म्हणून आयपीएलचा 18 वा हंगाम 9 मे रोजी एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आला. त्यानंतर दोन्ही देशातील तणाव कमी झाल्यानंतर बीसीसीआयने 12 मे रोजी आयपीएलचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार 17 मे पासून पुन्हा एकदा थरार रंगणार आहे.

हंगाम स्थगित करण्यात आला तेव्हा प्लेऑफसाठी जोरदार चुरस होती. आता पुन्हा हंगामाला सुरुवात होणार असल्याने सीएसके, राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबादचा अपवाद वगळता इतर 7 संघांमध्ये प्लेऑफसाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. मात्र त्यापैकी कोणत्या 4 संघांना प्लेऑफमध्ये पोहचण्याची अधिक शक्यता आहे? हे जाणून घेऊयात.

पॉइंट्स टेबलमधील अव्वल 4 संघ

पॉइंट्स टेबलमध्ये गुजरात टायटन्स पहिल्या स्थानी आहे. गुजरात टायटन्स प्लेऑफच्या उंबरठ्यावर आहे. गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु दोन्ही संघांचे प्रत्येकी 16-16 पॉइंट्स आहेत. आरसीबी दुसऱ्या स्थानी आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 8 सामने जिंकलेत. तर 3 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुजरातचा नेट रनरेट हा आरसीबीच्या तुलनेत चांगला आहे. त्यामुळे गुजरात पहिल्या स्थानी आहे. दोन्ही संघांनी उर्वरित 3 पैकी किमान 1 सामनाही जिंकला तर ते प्लेऑफसाठी जवळपास क्वालिफाय होतील.

पंजाब किंग्सने 11 पैकी 7 सामने जिंकले. तर 3 वेळा पंजाबला पराभूत व्हावं लागलंय. तर 1 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. पंजाब 15 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. पंजाबचे 3 सामने बाकी आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुंबई इंडियन्स टीमने 12 पैकी 7 सामने जिंकले आहेत. मुंबईच्या खात्यात 14 पॉइंट्स आहेत. पलटण चौथ्या स्थानी आहे.

हे संघही कायम

दरम्यान दिल्ली कॅपिट्ल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघही प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. या तिन्ही संघांना प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकणं बंधनकारक आहे. मुंबई आणि पंजाबने त्यांचे उर्वरित सामने गमावले आणि दिल्ली, लखनौसह कोलकाताने सर्व सामने जिंकले तर त्यांची प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता वाढू शकते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.