आचरा : आचरा-पारवाडी डोंगरेवाडी येथील कोळंबी प्रकल्पात (Shrimp Project) विष प्रयोग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. यात सुमारे १८ लाख किमतीची कोळंबी मृत झाली. हा प्रकार मंगळवारी (ता. १३) मध्यरात्री घडल्याचा अंदाज आहे. याबाबतची तक्रार या प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक अपूर्व अंत्तोन फर्नांडिस (रा. धुरीवाडा, मालवण) यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : फर्नांडिस यांनी तक्रारीत म्हटले आहे की, आचरा-डोंगरेवाडी येथे एकूण ३० एकर जमीन एका खासगी कंपनीच्या नावे कोळंबी प्रकल्प सुरू आहे. त्या कंपनीचा मी व्यवस्थापकीय संचालक आहे. एकूण १५ एकर प्रकल्पामध्ये आठ तलाव आहेत. प्रत्येक तलाव एक ते सव्वा एकरमध्ये आहे. सद्यस्थितीत चार तलावांमध्ये कोळंबी (चिंगुळ) प्रकल्प सुरू आहे. त्याला संपूर्ण जाळीचे कुंपण आहे.
प्रकल्पाच्या देखरेखीसाठी सहा कामगार आहेत. मी आणि माझे वडील आठवड्यातून दोन वेळा प्रकल्पावर येतो. कोळंबी शेती ऑक्टोबर ते मे अखेरपर्यंत चालते. पाऊस कालावधीत प्रकल्प बंद असतो. यावर्षी जानेवारीत कोळंबीची पिल्ले चेन्नईमधून आणून तळ्यांमध्ये सोडली होती. मेच्या पहिल्या आठवड्यात सुमारे ४०० किलो पूर्ण वाढ झालेली कोळंबी काढलेली होती. उर्वरित कोळंबी आम्ही मेच्या अखेरीस काढणार होतो.
दरम्यान, मंगळवारी (ता. १३) सायंकाळी सातच्या सुमारास कामगार नेहमीप्रमाणे कोळंबीला खाद्य देऊन घरी गेले. काही कामगार देखरेख करण्यास थांबले होते. रात्री अकराच्या सुमारास प्रकल्पामधील यंत्र कामगारांनी बंद केले. भागाची पाहणी केली व बाराच्या सुमारास यंत्रे पुन्हा सुरू केली. यावेळी आचरा-पारवाडीच्या दिशेने असलेल्या दोन तलावातील कोळंबी पाण्यावर तरंगत असल्याचे कामगारांना दिसले. त्यांनी याची माहिती पर्यवेक्षक परसनजीत मचरा यांना दिली. त्यांनी पाहाणी केली असता पाण्यातील ऑक्सिजन कमी झाल्याचा संशय आला. त्यांनी खाडीतील पाण्याचा पंप सुरू केला; परंतु, तलावातील कोळंबी मृत पडण्यास सुरुवात झाली.
याच दरम्यान तलावातून कसला तरी रसायनाचा वास येऊ लागला. याची माहिती त्यांनी फर्नांडिस यांना दिली. ते, बाहेरगावी असल्याने कोळंबी बाहेर काढण्यास सांगितले. कोळंबी बाहेर काढतेवेळी एका कामगाराला एका तलावात रसायनाने भरलेली बाटली मिळाली. तलावाच्या आजूबाजूला पाहणी केली असता तलावाच्या तळाला पिठाचे गोळे दिसले. त्याला रसायनयुक्त वास येत होता.
दरम्यान, फर्नांडिस यांनी आज दुपारी मुंबईवरून आल्यानंतर आचरा-पारवाडी येथील कोळंबी प्रकल्पाची पाहणी केली. यानंतर त्यांनी येथील पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. कोणीतरी व्यक्तीने प्रकल्पातील दोन तलावांत विष टाकून धोका उत्पन्न होईल, अशी कृती केल्याचे दिसून येते. यामुळे दोन्ही तलावांतील कोळंबी मृत पडून सुमारे चार हजार किलो वजनाचे अंदाजे १८ लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.
न्यायवैद्यक पथकाकडून नमुने ताब्यातदरम्यान, आज दुपारी आचरा-पारवाडी डोंगरेवाडी येथील कोळंबी प्रकल्पाची ओरोस येथून आलेल्या न्यायवैद्यक पथकाने पाहणी केली. पथकातील कमलेश सोनावणे, तनुजा रावले, आचरा पोलिस उपनिरीक्षक मीनाक्षी देसाई, बाळू कांबळे, सुशांत पुरळकर, स्वाती आचरेकर यांनी मृत कोळंबीचे व विषारी पदार्थांचे नमुने ताब्यात घेतले आहेत.