पिंपरी, ता. १६ : शहरातील ६५९ शाळांचे मॅपिंग करण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. केवळ ३५ टक्के शाळांचे मॅपिंग बाकी आहे. या मॅपिंगमुळे शाळा ऑनलाइन दिसणार आहेत. त्यामुळे शाळांची ठिकाणे, इमारतींची सद्यःस्थिती, तेथील मूलभूत सुविधांची माहिती त्वरित समजणार आहे.
शहरात महापालिका, अनुदानित, विनाअनुदानित खासगी अशा ६६५ शाळा आहेत. या शाळांचे मॅपिंग करण्याचे काम सुरू आहे. शाळेची इमारत, स्वयंपाक खोली, मुला-मुलींचे स्वच्छतागृह आदी सहा छायाचित्रे घेऊन स्कूलचे मॅपिंग करण्यात येत आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर या संस्थेने शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारच्या शाळांचे भौतिक ठिकाण छायाचित्रासह टॅग करून भौगोलिक तंत्रज्ञानाद्वारे सर्व माहिती एकत्रित करण्यासाठी मोबाईल ॲप ‘महा स्कूल जीआयएस’ विकसित केले आहे. या ॲपमध्ये शाळांना त्यांचा युडायस कोड किंवा युडायस प्लसमधील संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक यांनी नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून लॉगिन करण्यास सांगितले. त्यानंतर शाळेची युडयस प्लसमध्ये भरलेली माहिती या ॲपमध्ये दिसणार आहे.
भौतिक सुविधांचा सुटणार प्रश्न
शाळांचे मॅपिंग केल्याने चुकीच्या गोष्टींना आळा बसणार आहे. विद्यार्थ्यांच्या मूलभूत भौतिक सुविधांचा प्रश्न दूर होईल. शाळा मूळ मान्यतेच्या ठिकाणी आहे का? हे कळणार असल्याने बोगस शाळा उघड्या पडतील. शाळा नेमकी कोणत्या ठिकाणी आहे. शाळा मान्यतेच्या ठिकाणी आहे का? हे समजणार आहे. एकाच परिसरात किती शाळा आहेत. शाळांची सद्यःस्थिती कशी आहे, याची माहिती त्वरित कळणार आहे.
‘‘शाळा खासगी असो वा सरकारी प्रत्येक शाळेचे स्कूल मॅपिंग करणे अनिवार्य आहे. शाळांचे मॅपिंग जवळपास पूर्ण केले होते. मात्र, मंपिंगची पडताळणी केल्यानंतर काही ठिकाणचे मॅपिंग चुकीचे झाल्याचे आढळले. त्यामुळे नव्याने हे काम करण्यात येत आहे.’’
- संगीता बांगर, प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग प्राथमिक