Turkey-Azarbaijan Boycott: तुर्की-अझरबैजानचा 'प्लॅन कॅन्सल' करताय? पर्याय म्हणून शेजारी देश ठरतोय नवं डेस्टिनेशन
esakal May 16, 2025 08:45 PM

Where to Travel if Turkey and Azarbaijan Trip is Cancelled: सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव थोडा कमी झाला असला तरी, तुर्की आणि अझरबैजान या देशांबद्दल भारतीय लोकांचा राग अजूनही कमी झालेला नाही. कारण या दोन्ही देशांनी तणावाच्या काळात पाकिस्तानला पूर्ण पाठिंबा दिला होता. त्यामुळे अनेक भारतीय पर्यटक आणि ट्रॅव्हल कंपन्या आता तुर्की आणि अझरबैजानला बॉयकॉट करत आहेत. काही लोकांनी तर आधीच तिकिटं बुक केली होती, पण आता ते सारे प्लॅन रद्द करून नवीन ठिकाणी जाण्याचा विचार करत आहेत. अशा परिस्थितीत आर्मेनिया हा देश आता पर्यटकांच्या मनात पहिला पर्याय बनू लागला आहे.

आर्मेनिया

तुर्की आणि अझरबैजानसारखीच संस्कृती असलेला आणि या देशांच्या सीमेलगतच असलेला आर्मेनिया हा पश्चिम आशियातील एक छोटा पण अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक देश आहे. तुर्की आणि अझरबैजानचा बाजूलाच हा देश असल्यामुळे इथले हवामान, खाणे - पिणे, बोलणे - चालणे त्या देशांसारखेच आहे.

या देशाची संस्कृती अतिशय प्राचीन असून त्याचे धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पैलू पर्यटकांना भुरळ घालतात. आर्मेनियात सुमारे ९७ टक्के लोकसंख्या ख्रिश्चन धर्मीय आहे. त्यामुळे इथे अनेक प्राचीन आणि खास चर्च पाहायला मिळतात.

त्याच बरोबर जगातील पहिले चर्च होली एत्चमिआदजिन (Holy Etchmiadzin), चौथ्या शतकात याच देशात बांधलं गेलं होतं अशी मान्यता आहे. त्यामुळे ज्यांना इतिहास आणि कला आवडते, त्यांच्यासाठी आर्मेनिया एकदम योग्य ठिकाण आहे.

निसर्गाच्या कुशीतील ठिकाण

आर्मेनिया निसर्गप्रेमींना हवाहवासा वाटेल असा देश आहे. इथे भरपूर हिरवळ, उंचच उंच डोंगर, आणि सावन लेकसारख्या सुंदर गोड्या पाण्याच्या तळ्यांमुळे हे ठिकाण खरंच स्वर्गासारखे वाटते. इथे ट्रेकिंग, हायकिंग, स्कीइंग आणि पॅराग्लायडिंगसारख्या साहसी गोष्टींचाही आनंद घेता येतो. आर्मेनियाची राजधानी येरेवनमध्ये असलेले दिलिजन नॅशनल पार्क तर निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. इथे शांतता, हिरवेगार वातावरण आणि निवांतपणा सगळे काही अनुभवायला मिळते.

जगप्रसिद्ध वाईनचे केंद्र

ज्यांना वाईन प्यायला आवडते, त्यांच्यासाठी आर्मेनिया हे एक परिपूर्ण ठिकाण आहे. इथे वाईन तयार करण्याचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. इथला माउंट अरारात नावाच्या डोंगरावर उत्कृष्ट प्रतीची द्राक्षे पिकतात आणि त्यापासून उच्च दर्जाची वाईन तयार केली जाते. हा डोंगर आर्मेनियाचा अभिमान मानला जातो. प्राचीन काळात लोक या डोंगराची देवासारखी पूजा करायचे, कारण त्यांचा विश्वास होता की हा डोंगर त्यांना नैसर्गिक आपत्तींपासून वाचवतो.

असा करा प्लॅन

- मे ते ऑक्टोबर हे आर्मेनिया फिरण्यासाठी सर्वात उत्तम महिने मानले जातात. हिवाळ्यात येथे अतिशय थंडी पडते.

- देशाचं ट्रान्सपोर्ट नेटवर्क चांगलं चांगले असून स्थानिक लोक मदतीसाठी नेहमीच तत्पर असतात.

- मात्र, भाषेची अडचण येऊ शकते, त्यामुळे गुगल ट्रान्सलेटरचा वापर केल्यास सोयीचे ठरते.

- भारतीय पर्यटक आर्मेनिया साठी ई-व्हिसा ऑनलाईन अर्ज करू शकतात.

- यासाठी पासपोर्टची प्रत, हॉटेल बुकिंग, मेडिकल इन्शुरन्स, फ्लाइट बुकिंग आणि फोटो अपलोड करावे लागतात.

- एकंदरीत खर्चाचा विचार केला असता, सुमारे ३० ते ५० हजार रुपयांमध्ये तुम्ही आर्मेनियाची सहल आरामात करू शकता.

जर तुर्की आणि अझरबैजानवरील बहिष्काराचा विचार करत असाल, तर आर्मेनिया हा एक उत्तम, किफायतशीर आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो. इतिहास, निसर्ग, संस्कृती आणि साहस यांचं सुंदर मिश्रण अनुभवायचं असेल, तर आर्मेनियाला नक्की भेट द्या!

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.