डॉ. आंबेडकर स्मारक, संशोधन केंद्र उभारणीच्या कार्यास हातभार लावावा
esakal May 16, 2025 09:45 PM

kan152.jpg
64064
कणकवली : येथील आचरेकर प्रतिष्ठानमध्ये झालेल्या कार्यक्रमात आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते उत्तम कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. आंबेडकर स्मारक, संशोधन केंद्र उभारणीच्या कार्यास हातभार लावावा
आंनदराज आंबेडकर : कणकवलीत परिवर्तन दिन व सिंपन पुरस्कार वितरण सोहळा
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १५ : जानवली येथे सिंपन प्रतिष्ठानच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व संशोधन केंद्र उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्यांच्या कामाला बहुजन समाज व आंबेडकर यांच्या अनुयायांनी सहकार्य करावे, असे आवाहन आंनदराज आंबेडकर यांनी केले.
शहरातील आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात परिवर्तन दिन अभिवादन आणि सिंपन पुरस्कार प्रदान सोहळा झाला. याप्रसंगी श्री. आंबेडकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सिंपन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल तांबे, साहित्यिक उत्तम कांबळे, बाळकृष्ण जाधव आदी उपस्थित होते.
सन १९३८ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जानवली येथे महार परिषद घेतली होती. या ऐतिहासिक परिषदेच्या स्मृती जतन ठेवण्यासाठी सिंपन प्रतिष्ठान दरवर्षी १४ मे रोजी परिवर्तन दिन अभिवादन आणि सिंपन पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करीत आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. सिंपन प्रतिष्ठान डॉ. आंबेडकर यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करीत आहे. सध्या काळ हा मार्केटिंगचा असल्याने सिंपन प्रतिष्ठाने आपल्या कार्याचे मार्केटिंग केले पाहिजे असेही डॉ. आंबेडकर म्हणाले.
उत्तम कांबळे म्हणाले, सांस्कृतिक चळवळी उध्वस्त करण्याचे काम केंद्रातील सत्ताधारी व सनातनी विचारसरणीच्या संघटनांकडून पद्धतशीरपणे सुरू आहे. हा धोका बहुजनांनी वेळीची ओळखला पाहिजे. त्यांच्या कृतीला प्रतिकार केला पाहिजे.
अनिल तांबे यांनी सिंपन प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेत प्रतिष्ठानच्या माध्यमातून जानवली येथे डॉ. आंबेडकर स्मारक व संशोधन केंद्र उभारण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात प्रा. रमाकांत यादव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा सिंपन जीवन गौरव पुरस्कार साहित्यिक उत्तम कांबळे, प्रा. विजय जामसंडेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सिंपन विजयी भव पुरस्कार निवेदक, अभिनेता, व्याख्याता निलेश पवार यांना आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सिंपन अमृत पुरस्कार सेवानिवृत्त शिक्षक भास्कर तांबे, विनायक मिठबावकर, कवी जनीकुमार कांबळे यांना आंबेडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
सिंपन सन्मान पुरस्कार डॉ.सतीश पवार, डॉ. सुयश डिकवलकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ख्यातनाम चित्रकार नामानंद मोडक, संदीप कदम, जयप्रकाश कदम, अशोक कदम, ॲड. वाय. डी. सावंत यांचाही सन्मान करण्यात आला. तर, दिवंगत अनिल कृष्णा कदम यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात देण्यात आला. सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. आभार वैशाली जाधव यांनी मानले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.