आता सुटी सुरू झाली, की कुठेतरी प्रवासाला जाणं होणारच आणि प्रवासाला जायचं म्हणजे, त्यात तीन प्रकार आलेच. एक, नातेवाईकांकडे जायचं. दोन, प्रेक्षणीय स्थळं पाहायला किंवा थंड हवेच्या ठिकाणी जायचं. तीन, मुलांनी किंवा पालकांनी स्वतंत्रपणे किंवा मिळून ट्रेकला जाणं, गिरीभ्रमण करायला जाणं.
या प्रत्येक प्रवास प्रकाराची तयार वेगवेगळी असते. ‘प्रवासाची तयारी झाली का?’ या प्रश्नाचा अर्थ असतो, ‘तिकिटं कन्फर्म झाली का?’ आणि ‘बॅगा भरून झाल्या का?’... पण प्रवासाच्या तयारीबद्दल मला वेगळंच काही तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे प्रवासाला निघण्याआधी आपली मानसिक, बौद्धिक आणि काहीवेळा शारिरीक तयारी काय आणि कशी करायची याबाबत आपण मोकळेपणाने ठरवू.
नातेवाईकांकडे जायचे असलं तरी नियोजन हवेच. अशावेळी सर्वांनी मिळून काय-काय करायचं, आणि फक्त आपण काय करायचं, याचं नियोजन मनात तयार असावं लागतं. मुख्य म्हणजे, आपल्या मनातील नियोजनाप्रमाणंच सगळं होईल असं नाही. त्यात अनपेक्षित बदल होऊ शकतात. आपल्याला तडजोड करावी लागू शकते, याचं भान असावं.
म्हणून अशावेळी नियोजन कागदावर नव्हे, तर मनातच असावं. कारण ‘आपण जेव्हा नातेवाईकांच्या गराड्यात असतो किंवा मित्रांच्या घोळक्यात असतो अशावेळी निर्णय ‘सर्वांनी मिळून घेतला जातो’ हे समजून घेतलं, की मतभेदांना मजेशीर गमतीचा तडका बसतो’ अशी एक लंबेलांब चिनी म्हण आहे म्हणे.
आपल्याला काही प्रेक्षणीय स्थळं पाहायला जायचं असेल, तर त्याआधी ‘गुगल’बाबांची मदत घेऊन खूपच काम करावं लागतं. आपण जिकडे जाणार आहोत तिथलं हवामान आणि तापमान कसं असणार आहे याचा अंदाज घेऊन सोबत घ्यायचे कपडे ठरवा. पाहणार असणाऱ्या स्थळांविषयी माहिती वाचणे, शक्य असल्यास त्याविषयीची पुस्तकं वाचा.
त्या प्रेक्षणीय स्थळाचा इतिहास, खासियत, तिथल्या नेमक्या कुठल्या गोष्टी कशा पाहाव्यात यांचे बारकावे आणि त्यावरून आपलं स्वत:चं एक छोटं टिपण तयार करा. अशा ठिकाणी काय खरेदी करायची आणि कुठे करायची याचा आधीच अंदाज घेता येतो. फावल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी, प्रेक्षणीय स्थळाच्या आजूबाजूला आणखी काही पाहण्यासारखे आहे का, याचा शोध घ्यावा लागतो.
अनोळखी गावात फिरण्यासाठी वेळ राखून ठेवावा लागतो. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ‘अशा ठिकाणी’ आपण वारंवार जाणार नसल्यानं दिवसाचं काटेकोर वेळापत्रक तयार करणं गरजेचं असतं. कुठल्याही प्रेक्षणीय स्थळाची सहल म्हणजे फक्त ‘टाइमपास आणि मजा’ नव्हे. प्रेक्षणीय स्थळं पाहताना, त्यातील नवनवीन गोष्टी समजून घेताना आलेली मजा अनुभवण्यासाठी अशा ठिकाणी जायचं असतं, हे लक्षात असू द्या.
ट्रेकला किंवा गिरीभ्रमण करण्यासाठी जायचं असेल, तर आधी स्वत: तंदुरुस्त असावं लागतं. त्यासाठी आधी व आवश्यक प्रयत्न करावे लागतात. ट्रेक, गिरीभ्रमण यांचा अनुभव असलेल्यांशी बोलून तेथे येऊ शकणाऱ्या संकटांची, कराव्या लागणाऱ्या साहसांची माहिती घ्यावी लागते.
संकटं येणारच आहेत, अशी कल्पना करून त्यावर मात कशी करावी याचा काहीवेळा आधी सरावही करावा लागतो. मुख्य म्हणजे गिरीभ्रमणासाठी स्वत: फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही खंबीर आणि कणखर असावं लागतं. यासाठीच तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या देखरेखीखाली अगोदर भक्कम तयारी करावी लागते.
‘नियोजनाशिवाय प्रवास म्हणजे विनातिकीट प्रवास आणि समोर टीसी उभा’ अशी एक चिनी म्हण तुम्ही ऐकलीच असेल म्हणा.