नअस्कार! मी अत्तिशय रागावलेली आहे. भाषाविज्ञान या विषयाकडे एखाद्यानं किती दुर्लक्ष करायचं, याला काही लिमिट?
मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मी ‘सोस्यूर ते चॉम्स्की’ या प्रा. मिलिंद मालशेलिखित भाषाविज्ञानविषयक ग्रंथाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला गेले होत्ये. तिथं मला कळलं की भाषाविज्ञान मराठी भाषेत शिकवण्याची सोय महाराष्ट्रात जवळजवळ नाहीच. ज्याअर्थी ती महाराष्ट्रात नाही, त्याअर्थी ती केरळ, सिक्किम, उत्तर प्रदेश वगैरे ठिकाणीही नसणारच.
काय हे?
‘महाराष्ट्रात बारा कोटी लोक राहतात. पण तरीही इथं कुठल्याही मराठी विद्यापीठात भाषाविज्ञान शिकण्याची सोय नाही, कारण ते कुणी शिकवतच नाही,’ असा खळबळजनक आरोप प्राध्यापक, समीक्षक प्रभाकर नारायण परांजपे यांनी आपल्या भाषणात केला, आणि महाराष्ट्र सारस्वताच्या दरबारातल्या अनेक मनसबदारांची तीव्र शब्दात निर्भर्त्सना केली. प्राध्यापकमंडळीच जर भाषाविज्ञानात रस घेत नसतील, तर तो विद्यार्थ्यांमध्ये कसा येणार? आड में ही नहीं, तो पोहरे में कैसा आयेगा?
…पण नाही! वाचकहो, जगात देव आहे! मराठीत भाषाविज्ञानाचा एक सुंदरसा जिव्हाळा फुटावा, म्हणून प्रसिद्ध विचारशील लेखक आणि शास्त्रीय संगीताचे जाणकार गायक पं. मिलिंद मालशेबुवा यांनी ‘सोस्यूर ते चॉम्स्की’ हे भाषाविज्ञानावरील निवडक आठ भाषापंडितांच्या टीकानिबंधांचं भाषांतर सादर केलं आहे. -जणू बंदिशींचा गुच्छच! डॉ. मालशे आहेत म्हणून मराठीची थोडीतरी अब्रू राहिली…ती पुढेही टिकण्याचा संभव निर्माण झाला.
लोकवाङमयगृहा’तर्फे हे पुस्तक नुकतंच प्रकाशित करण्यात आलं. फेर्दिनां द सोस्यूर नामक एक नामांकित स्विस विद्वान होते. त्यांनी भाषाविषयक जी काही व्याख्यानं दिली, त्यांचं एक पुस्तक त्यांच्या विद्यार्थ्यांनी १९१९च्या सुमारास प्रसिद्ध केलं. त्याच्या पाचेक वर्ष आधी सोस्यूर निवर्तले होते.
हे पुस्तक होतं – ‘कोर्स इन जनरल लिंग्विस्टिक्स.’ हे पुस्तक भाषाविज्ञानाच्या क्षेत्राचं जनक ठरलं… यानंतर वेळोवेळी काही विद्वानांनी त्यावर अभ्यासपूर्ण विवेचन, मीमांसा वगैरे केली. त्यांच्या निबंधांचं मराठीत सटीक भाषांतर मालशेबुवांनी केलं. ‘मराठी वाचकांची तयारी आणि वकूब ओळखून हे भाषांतर केलं आहे, असं ‘प्रनां’नी सर्टिफिकेट दिलं आहे. त्याअर्थी ते बरंच बाळबोध असणार असं वाटून मी विकत आणलंय! असो!!
सुंदरसा डिझायनर कुर्ता घालून गाण्याच्या मैफलीला आल्याप्रमाणे दिसणाऱ्या डॉ. मालशेंनी सांगितलं की, भाषाविज्ञान हे वैज्ञानिक अभ्यासपद्धती वापरणारं विशिष्ट असं अभ्यासक्षेत्र आहे. सोस्यूरनं व्याख्यानांतून मांडलेली तत्त्व आधुनिक भाषाविज्ञानाला पायाभूत ठरली. विविध भाषाभ्यासकांनी त्यावर मंथन करून आपापले विचार मांडले आहेत, तेच या पुस्तकरूपांत मांडले.
यामध्ये भारतीय भाषांचाही संदर्भ आहे. मराठी भाषेत हे विचार एकत्रित यावेत, हा भाषांतर करण्यामागचा एक महत्त्वाचा हेतू होता. भाषा ही व्यवस्था असते. तिच्या अनेक पातळ्या असतात. ध्वनी, शब्दरूपं, वाक्य आणि अर्थ अशा अनेक स्तरांवर ही व्यवस्था कशी घडलेली असते, याचा अभ्यास व संशोधन भाषाविज्ञानात होतं. हे आधुनिक विचारधन मराठीमध्ये आणणं मला महत्त्वाचं वाटलं...
…हे मी ऐकत पटवर्धन सभागृहात सुस्कारे टाकत बसले होत्ये. मालशेसरांनी नर्म सूर लावला, पण ‘प्रनां’नी तलवार चालवलेली मी बघितली. ‘प्रनां’नी एकंदर भाषाविज्ञानाबद्दलच्या अनास्थेखातर बोल लावलेले पाहून मी शेजारी मान खाली घालून बसलेल्या एका मराठीच्या प्राध्यापकांना विचारलं की, ‘का हो, का नाही शिकवत तुम्ही मुलांना भाषाविज्ञान?’
‘‘शिकवायला प्रॉब्लेम नाही, पण झोप येते..,’ ते म्हणाले.
‘आजकालचे विद्यार्थी हे असलेच!’ मीही रागात बोलले. त्यावर कसनुसं हसत त्यांनी कडकडीत जांभई दिली. असो!