तुर्कियेस्थित सेलेबी कंपनीशी करार रद्द
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : भारत-पाकिस्तान संघर्षात तुर्कियेने पाकिस्तानला समर्थन दिल्यानंतर भारतातून नेटिझन्सनी तुर्कियेला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर तुर्कियेची आर्थिक नाकेबंदी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याची सुरुवात तुर्कियेमध्ये मुख्यालय असणाऱ्या सेलेबी या विमानतळावरील सुविधा पुरवणाऱ्या कंपनीला फटका बसण्यापासून झाली आहे.
दिल्लीपाठोपाठ मुंबई व अहमदाबाद विमानतळ व्यवस्थापनानेदेखील तुर्कियेस्थित सेलेबी कंपनीशी करार रद्द केले आहेत. एअरपोर्ट ग्राऊंड हँडलिंग व्यवस्थापनामधील ही एक अग्रेसर कंपनी आहे; मात्र तुर्कियेने भारत-पाकिस्तान संघर्षात घेतलेल्या भूमिकेमुळे भारतीयांकडून तुर्कियेशी संबंधित अनेक गोष्टींवर बहिष्कार टाकला जात आहे. तुर्कियेतील पर्यटनस्थळांवरदेखील भारतीयांनी जाऊ नये, असे आवाहन केले जात आहे. दिल्ली विमानतळाने याआधीच सेलेबीशी करार केला आहे. त्यापाठोपाठ अदाणी समूहाकडे व्यवस्थापन असणाऱ्या मुंबई व अहमदाबाद विमानतळ प्रशासनाने सेलेबीशी केलेला करार रद्द केला आहे. ‘नव्या ग्राऊंड हँडलिंग एजन्सीच्या माध्यमातून आम्ही सर्व विमान कंपन्यांना अखंडित सेवा पुरवत राहू. सध्या सेलेबी कंपनीशी करारबद्ध असणारे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई व सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, अहमदाबाद या दोन्ही विमानतळांवरील सर्व कर्मचारी हे नव्या कंपनीकडे हस्तांतरित केले जातील. त्यांच्या कामाच्या सर्व अटी व शर्ती त्याच राहतील’, असे निवेदन दोन्ही विमानतळांच्या प्रवक्त्यांनी दिले आहे.