- आयुषी जीना, अभिनेत्री
माझ्यासाठी आई म्हणजे केवळ जन्मदात्री नव्हे, तर आयुष्यभरासाठीचं एक मजबूत पाठबळ आहे. पण माझ्या आयुष्यात ‘आई’ ही केवळ एक व्यक्ती नव्हती तर त्या दोन व्यक्ती होत्या. आईनं मला जन्म दिला; पण आत्यांनी मला घडवलं. मी शिकत होते, तेव्हा माझ्या आत्यानं मला संपूर्ण मार्गदर्शन केलं. ती माझी संरक्षक होती.
घर चालवतानाच ती माझ्या अभ्यासाकडेही लक्ष द्यायची. मला कितीही अडचणी आल्या, तरी ती माझ्यासाठी उभी राहिली. आई आणि आत्या या दोघी मिळून माझ्या आयुष्याचा आधारस्तंभ आहेत. त्यांच्या प्रेमात, शिस्तीत आणि समजूतदारपणातच माझं खरं शैशव होतं. त्यामुळे माझ्यासाठी आई म्हणजे एक भावना आहे जिथं प्रेम, आधार आणि प्रेरणा यांचा संगम असतो.
आईनं नेहमीच माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवला. मी अभिनयात करिअर करायचं ठरवलं, तेव्हा माझ्या वडिलांना ते अजिबात पटत नव्हतं; पण आईनं माझी साथ सोडली नाही. ती लपून अभिनय क्लासेसचे पैसे भरायची, इतका तिचा माझ्यावर विश्वास होता.
तिच्या त्या निर्णयामुळे आमच्या कुटुंबात एक मोठा बदल घडला. पूर्वी महिलांचे निर्णय फारसे ऐकले जात नव्हते; पण आईच्या धैर्यानं आमचं घर बदललं. आता आमच्या घरात मुलींच्या मताला महत्त्व दिलं जातं, त्यांच्या स्वप्नांना बळ दिलं जातं. आईनं केवळ मला नाही, तर आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या विचारसरणीला दिशा दिली.
आई आणि आत्यांमुळेच माझं आयुष्य समृद्ध झालं. आत्याने माझ्या मनात वाचनाची आवड निर्माण केली. तिला स्वतःला खूप वाचनाची हौस होती आणि ती मला नेहमी सांगायची की, ‘ज्ञान हाच खरा दागिना आहे.’ तिच्यामुळेच मला पुस्तकांचं आणि शिकलो त्या प्रत्येक गोष्टीचं महत्त्व कळलं.
दुसरीकडे, आईनं अभिनयाची आवड मला लहानपणापासून दिली. ती अभिनय करायची नाही; पण तिचं आयुष्यच एक सुंदर नाटक वाटायचं. हसणं, रडणं, खेळणं, सगळं ती मनापासून करत असे. जेव्हा मी अभिनय शिकण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा तीच माझी पहिली गुरू ठरली. तिनं मला प्रोत्साहन दिलं, धीर दिला आणि मार्ग दाखवला. मी सध्या ‘ॲंड टीव्ही’वरील ‘भीमा’ या मालिकेत धर्मशीलाची भूमिका साकारत आहे.
आईचा धैर्य आणि आत्याचा समजूतदार स्वभाव हे दोन्ही गुण मला आयुष्यभरासाठी स्वतःमध्ये रुजवायचे आहेत. आईनं कोणत्याही परिस्थितीत हार मानली नाही. वडिलांचा विरोध असो वा आर्थिक अडचणी, ती कायम माझ्यासाठी उभी राहिली. तिच्या नजरेत मी तिचं स्वप्न होते. तिचं ते धैर्य, प्रत्येक आईमधलं, मला खूप प्रेरणा देतं.
आत्या मात्र शांत स्वभावाची होती. ती कितीही कठीण प्रसंगात संयम ठेवायची, निर्णय विचारपूर्वक घ्यायची. तिचा प्रत्येक सल्ला मला आजही योग्य वाटतो. मी अभिनय करत असताना, अनेकदा तिचं स्मरण करतच एखाद्या पात्रात शिरते. तिचं जीवनदृष्टी मला आत्मिक बळ देतं.
आईविषयी एक हृदयस्पर्शी आठवण नेहमी माझ्या डोळ्यांसमोर जिवंत उभी राहते. मी एकदा होळीच्या दिवशी घरात एकटी होते. सगळेजण कुठे बाहेर गेले होते आणि मी खूप उदास होते. तेव्हा आईनं माझ्या चेहऱ्यावरचं ते एकटेपण ओळखलं. ती काही न बोलता घरात गेली, एक मजेशीर गाणं लावलं आणि पुरुषाचा पेहराव करून बाहेर आली. मग ती भरपूर उत्साहानं माझ्यासाठी नाचायला लागली.
तिचे हावभाव, तिचं नाचणं सगळं इतकं निरागस होतं की, मी हसून हसून थकले. ती केवळ माझ्यासाठी ‘अभिनय’ करत होती. कारण मला आनंद मिळावा. त्या दिवशी कळलं की, आईचं प्रेम केवळ काळजीपुरतं मर्यादित नसतं, तर ती आपल्या चेहऱ्यावरचं हास्य जपण्यासाठी काहीही करू शकतं. ती आठवण म्हणजे माझ्या आयुष्याचं सर्वांत सुंदर क्षणचित्र आहे.
आईनं एकदा मला सांगितलेले वाक्य, जे मी कधीच विसरणार नाही. ‘स्वप्नं ही डोळ्यांनी पाहायची नाहीत, ती मनाने जगायची असतात आणि मी कायम तुझ्या पाठीशी आहे.’
ते शब्द मला आजही आठवतात, जेव्हा मी स्टेजवर उभी असते किंवा कॅमेरासमोर एखादा भावनिक प्रसंग करते. हे वाक्य म्हणजे आईच्या विश्वासाचं प्रतीक आहे. हेच वाक्य मला कठीण काळात उभं करतं, धीर देतं आणि आठवतं, की कोणी तरी आहे, जिला माझ्यावर निःस्सीम विश्वास आहे.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)