Satara Crime: सासूच्या खूनप्रकरणी जावयास जन्मठेप, वडूज न्यायालयाचा निकाल; सासूच्या खूनच नेमक काय कारण ?
esakal May 18, 2025 03:45 PM

म्हसवड : घटस्फोटाच्या कारणावरून सासूचा खून केल्याप्रकरणी नरवणे (ता. माण) येथील जावई आरोपी आबासाहेब बबन काटकर (वय ४२) यास वडूज येथील जिल्हा सत्र न्यायालयाने आज जन्मठेप, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली, तर अन्य गुन्ह्यांत तीन वर्षे सक्तमजुरी व सहा महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, अशी २२ मार्च २०१८ रोजी सायंकाळच्या सुमारास शिवाजीनगर- कुकडवाड (ता. माण) येथे सासूच्या घरासमोर फिर्यादी ही तिची नणंद जखमी वैशाली आबासाहेब काटकर (वय ४०) व मृत सासू रंजना हणमंत भोसले (वय ५५, दोघी रा. शिवाजीनगर- कुकुडवाड) या अंगणात लसूण सोलत बसल्या असताना आरोपी आबासाहेब काटकर त्याठिकाणी आला व वैशाली यांना घटस्फोट देण्याचे कारणावरून शिवीगाळ दमदाटी केली. रंजना यांनी आरोपीला शिवीगाळ करायचे नाही, असे सांगितले.

त्या वेळी आरोपीने रंजना यांना आता तुला दाखवतो, असे म्हणून त्याने त्याच्या हातातील पिशवीतील चाकू हातात घेऊन रंजना यांचा गळा धरला. वैशाली सोडवण्यास गेली असता आरोपीने तिला ढकलून दिले व रंजना यांना गळ्याला धरून घरामध्ये नेले. त्यावेळी वैशाली ओरडल्याने शेजारी राहणाऱ्या चुलत सासू सुनीता बाहेर आल्या. त्या दोघी आतमध्ये जात असताना वैशाली व रंजना यांच्यावर आरोपीने चाकूने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला.

सुनीता यांनी रंजना यांना सोडविण्यासाठी प्रयत्न केला असता त्यांनाही आरोपीने ढकलून दिले व रंजना यांच्यावर चाकूने वार करून ठार केले. त्यानंतर तेथून पळून गेला. याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यात तपास करताना तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले, तसेच वैद्यकीय पुरावे जमा केले. पोलिस हवालदार एस. एस. सानप यांनी मदत केली.

वडूज येथील अतिरुक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अॅड. वैभव काटकर यांनी काम पाहिले. यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने ११ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचे जबाब, कागदोपत्री व वैद्यकीय पुरावा, सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी आरोपी आबासाहेब काटकर यास जन्मठेप व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, अन्य गुन्ह्यांत तीन वर्ष सक्तमजुरी व सहा महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली.

खटला चालवण्यासाठी दहिवडीचे पोलिस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे, म्हसवडचे सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी मार्गदर्शन केले, तसेच प्रॉसिक्युशन स्क्वॉड पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, पोलिस हवालदार विजयालक्ष्मी दडस, आमीर शिकलगार, सागर सजगणे, जयवंत शिंदे आदींनी सहकार्य केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.