सनरायजर्स हैदराबादने मंगळवारी लखनौ सुपर जायंट्सवर मात केली. लखनौचा या पराभवासह आयपीएलच्या 18 व्या मोसमातील आव्हान संपुष्ठात आलं. लखनौ आयपीएल 2025 मधून बाहेर पडणारी पाचवी टीम ठरली. लखनौला 12पैकी फक्त 5 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला. तर लखनौचा 7 सामन्यांमध्ये पराभव झाला. या संपूर्ण स्पर्धेत कर्णधार म्हणू ऋषभ पंत याने निराशा केली. तसेच पंतला बॅट्समन म्हणूनही काही खास करता आलं नाही. लखनौच्या पराभवानंतर आणि स्पर्धेतून पत्ता कट झाल्यानंतर संघ मालक संजीव गोयंका यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
संजीव गोयंका हे लखनौच्या प्रत्येक सामन्याला स्टेडियममध्ये उपस्थिती लावतात. लखनौच्या पराभवानंतर गोयंका यांनी अनेकदा खेळाडूंवर नाराजी व्यक्त केलीय. मात्र गोयंका टीमचा उत्साह वाढवण्यातही आघाडीवर असतात. मात्र या मोसमात लखनौला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. परिणामी त्यांना आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी आता वर्षभराची प्रतिक्षा करावी लागणार आहे. हैदराबाद विरूद्धच्या पराभवानंतर गोयंका यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन पोस्ट करत खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला.
“या हंगामातील दुसरा टप्पा आव्हानात्मक राहिला आहे. मात्र अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे धैर्य मिळतं. भावना, प्रयत्न आणि उत्कृष्टतेचे क्षण आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात. दोन सामने बाकी आहेत. चला अभिमानाने खेळूया आणि दमदारपणे शेवट करूया”, असं म्हणत गोयंका यांनी खेळाडूंचा उत्साह वाढवला आहे.
संजीव गोयंका यांनी एक्स पोस्टमध्ये लखनौच्या खेळाडूंसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. गोयंका या पोस्टमध्ये लखनौच्या खेळाडूंसह हसताना दिसत आहेत. या फोटोत गोयंका यांनी कॅप्टन ऋषभ पंतच्या खांद्यावर हात ठेवला आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
संजीव गोयंका यांना या हंगामात 27 कोटी रुपयांचा चुना लागल्याचं म्हटलं जात आहे. गोयंका यांनी मेगा ऑक्शनमधून ऋषभ पंत याला 27 कोटी रुपये खर्चून आपल्या गोटात घेतलं. पंत यासह आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. मात्र पंतला या मोसमात त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे गोयंका यांना 27 कोटींचा चुना लागला, असं सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून म्हटलं जात आहे.
संजीव गोयंका यांची पोस्ट
ऋषभ पंत याने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 12 सामन्यांमध्ये 12.27 च्या सरासरीने आणि 100.00 च्या स्ट्राईक रेटने 135 बॉलमध्ये 135 धावा केल्या आहेत.पंतच्या या खेळीत फक्त एकाच अर्धशतकाचा समावेश आहे. तसेच पंतने या मोसमात 6 सिक्स आणि 12 फोर लगावले आहेत.