वेल्हे, ता. २० : राजगड तालुक्यातील किल्ले राजगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारावे व शिवप्रेमींवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांनी दिली आहे.
याबाबत उपविभागीय अधिकारी महेश हरिश्चंद्रे यांच्याकडे निवेदन सोमवारी (ता.१९) देण्यात आले. राजगडावर चौथरा व मेघडंबरी उभी करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शिवप्रेमींनी उभा केला होता. याबाबत पुरातत्त्व विभाग आणि प्रशासन यांच्याकडून शिवप्रेमीवर गुन्हा दाखल करून राजगडावरील पुतळा हटविल्याची घटना नुकतीच तालुक्यात घडली. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. ऐतिहासिक किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे कायमस्वरूपी स्मारक उभे करावे, ही शिवप्रेमीची इच्छा आहे. किल्ले राजगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक १९ जूनपर्यंत उभे करावे. तसे न झाल्यास १९ जूननंतर शिवप्रेमी किल्ले राजगडावर शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करतील व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तहसील कार्यालयासमोर उपोषण व तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदन देताना तहसीलदार निवास ढाणे, तालुका अध्यक्ष दिगंबर चोरघे, संघटक रवींद्र घाडगे, माजी सरपंच अशोक चोरघे, विकास भिकुले, प्रमोद भोरेकर, अनंता आधवडे, भीमाजी देवगिरीकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.