Lightning Strike : शेतातून घरी जाताना काळाचा घाला; वीज कोसळून दोघांचा जागीच मृत्यू, भोकरदन तालुक्यातील घटना
Saam TV May 20, 2025 10:45 PM

अक्षय शिंदे 
जालना
: मागील काही दिवसापासून जालना जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे. दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस होत आहे. अशात शेतातील कामे आटपून घराकडे निघाल्यानंतर पाऊस सुरु झाल्याने लिंबाच्या झाडाखाली दोघेही उभे राहिले. याचवेळी अंगावर वीज कोसळून दोन व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भोकरदन तालुक्यात घडली आहे. 

जालना जिल्ह्यातील तालुक्यातल्या पिंपळगाव रेणुकाई शिवारात असलेल्या कोळी कोठा या गावातील ही घटना आहे. या घटनेत गणेश प्रकाश जाधव आणि सचिन विलास बावस्कर अशी पडून मृत्यू झालेल्या दोन व्यक्तींची नावे आहेत. अवकाळी पावसाचे थैमान सुरु असले तरी आगामी मान्सूनच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी शेती तयात करण्याची कामे सुरु आहेत. त्यानुसार गणेश जाधव व सचिन बावस्कर हे शेतात कामासाठी गेले होते. काम आटोपून घराकडे जाताना घटना घडली आहे. 

जालन्यात येलो अलर्ट 

मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. दरम्यान जिल्ह्याला पुढील तीन दिवस विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या काळात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मनमाड परिसरात जोरदार पाऊस 

मनमाड शहर व पारिसराला आज पुन्हा दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. सलग १५ दिवसांपासून कधी जोरदार तर कधी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर आज दुपारी एक तास झालेल्या पावसाने रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. तर नेहमी प्रमाणे विजांचा गडगडाट सुरू होताच वीज मात्र गायब झाल्याने मनमाडकर नागरिकांना अंधारात बसावे लागले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.