पोटभाडेकरूंचा सामासिक जागेवर डल्ला
esakal May 20, 2025 10:45 PM

वाशी, ता. २० (बातमीदार) : बेलापूरपासून दिघ्यापर्यंत प्रत्येक विभागातील सामासिक जागेवर पोटदुकानदारांनी डल्ला मारला आहे. दुकानाबाहेर सामान ठेवणे, बाहेरच्या मोकळ्या जागेत पत्रा लावून ती जागा दुसऱ्या व्यावसायिकाला भाड्याने देणे, अशा पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने चालणाऱ्या प्रकारांवर तत्कालीन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चाप लावला होता. त्यामुळे सर्व पदपथ मोकळे झाले होते; परंतु ही परिस्थिती पुन्हा फोफावली असून, दुकानदारांनी सामासिक जागा गिळंकृत केल्याचे दिसून येत आहे.
ऐरोलीमध्ये काही वर्षांपूर्वी खाली दुकान आणि वरती घर असणाऱ्या ठिकाणी घरात आग लागून दोघींना जीव गमावावा लागल्याची घटना घडली होती. त्यामुळे दुकानांच्या जागांचा गैरवापर हा मुद्दा चर्चेत येऊ लागला होता. नवी मुंबईत अनेक ठिकाणी दुकानाबाहेर बेकायदा फेरीवाले आहेत. गॅसचा वापर करून खाद्यपदार्थांच्या गाड्या लावण्यात आल्या आहेत. चहाच्या टपऱ्याही आहेत. पदपथ अडवण्यात आल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे जिकिरीचे झाले आहे. तत्कालीन पालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनीही सुरुवातीला अतिक्रमणांवर मोठ्या प्रमाणात धडाकेबाज कारवाई केली होती; पण नंतर कोरोना काळात कारवाई थंडावल्याने पुन्हा सामासिक जागांचा गैरवापर होऊ लागला आहे. अनेक हॉटेल व्यावसायिकांनी तात्पुरते गुंडाळलेले शेड पुन्हा लावले आहेत.
--------------
सायंकाळ होताच मोकळ्या जागांवर व्यवसाय
पालिकेची मोहीम थंडावल्यामुळे वाशी, नेरूळ, कोपरखैरणे, सीवूड्स, बेलापूरसह सर्वच विभागांत कमी-अधिक प्रमाणात अशीच स्थिती आहे. आता सामासिक जागेवरील कारवाई थंडावल्यामुळे सायंकाळ होताच पुन्हा मोकळ्या जागा अडवल्या जात आहेत. दुकानदारही दुकानातील बराच माल पुन्हा बाहेर ठेवू लागले आहेत. पोटभाडेकरूकडून चांगले भाडे मिळत असल्याने जागा अडवून एकाच दुकानदाराने दोन-तीन पोटभाडेकरू ठेवल्याचे प्रकारही पाहायला मिळतात.
----------
१० ते १२ हजार पोटभाडे
वाशी रेल्वेस्थानकाबाहेर असलेल्या किऑस्कमध्ये जे व्यवसाय केले जातात, तेथे मोठ्या प्रमाणात गॅसचा वापर होतो. त्या ठिकाणी पोटव्यवसाय थाटले आहेत. एका लहान पानटपरीसाठी दरमहा १० ते १२ हजार रुपये भाडे घेतले जाते. ट्रान्स हार्बर मार्गावरील ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, सानपाडा, बेलापूर या रेल्वेस्थानकाबाहेरील मोकळ्या जागेत विविध दुकानांबाहेरच्या पोटव्यावसायिकांकडून आठ ते नऊ हजार रुपये पोटभाडे वसूल केले जात आहे.
------------------
शहरातील सामासिक जागेचा वापर करणाऱ्यांवर पालिकेकडून कारवाई करण्यात येत असते. फेरीवाले व व्यावसायिकांनी या जागांचा वापर केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
- भगवान डोईफोडे, उपायुक्त, अतिक्रमण विभाग

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.