वृत्तपत्र विक्रेत्याचा बसच्या धडकेने मृत्यू
esakal May 21, 2025 01:45 AM

राजगुरुनगर, ता. २० : येथील रहिवासी आणि चाकण येथे वृत्तपत्र एजन्सीचा व्यवसाय करणारे नंदकुमार गुलाबचंद कर्नावट (वय ६७) यांना, राजगुरुनगर एस. टी. बस स्थानकाजवळ, एस. टी. बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (१९ मे) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली.
कर्नावट हे सोमवारी संध्याकाळी व्यवसाय संदर्भातील कामे उरकून चाकण येथून राजगुरुनगरला आले. ते चालत रस्त्याकडे निघाले असतानाच एसटी स्थानकाच्या प्रवेशमार्गाजवळ त्यांना पुण्याकडून भरधाव येणाऱ्या पुणे-नारायणगाव एस. टी. (एम. एच. १४ - बीटी १६९७) बसने धडक दिली. एसटीचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांचा मुलगा सिद्धेश याने खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरूनचालक पांडुरंग नारायण गरड याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस हवालदार संतोष मोरे पुढील तपास करीत आहेत.
स्वर्गवासी नंदकुमार कर्नावट राजगुरुनगर येथील रहिवासी होते. ते सुमारे ४० वर्षांपासून चाकण येथे वृत्तपत्र एजन्सीचा व्यवसाय करीत होते. सकाळची चाकण परिसरातील एजन्सी त्यांच्याकडे होती. त्यांच्या अचानक मृत्युमुळे चाकण व राजगुरुनगर परिसरातील वाचकांकडून हळहळ व्यक्त करण्यात आली.
कर्नावट यांच्यामागे पत्नी, दोन मुले, भाऊ, पुतणे असा परिवार आहे. पत्रकार सिद्धेश कर्नावट व वेब डेव्हलपर कल्पेश हे त्यांचे पुत्र होत. तर राजगुरुनगर बाजारपेठेतील प्रथितयश व्यावसायिक इंद्रभान कर्नावट हे त्यांचे बंधू होत. येथील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

03771

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.