65096
सिंधुदुर्गनगरीत शेकडो ‘आशा’ एकवटल्या
प्रलंबित प्रश्नांसाठी शासनाविरोधात गगनभेदी घोषणा
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २० ः राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या आशा व गटप्रवर्तक यांच्या थकीत मोबदल्यासह विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक एकत्र येत रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला. यामध्ये जिल्ह्यातील शेकडो आशा कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.
विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गगनभेदी घोषणा देत सिंधुदुर्गनगरी कार्यालय परिसर दणाणून सोडला. आजच्या या मोर्चासाठी दुपारपासून पोलीस प्रशासनाकडून कडक पोलिस बंदोबस्त होता. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत गटप्रवर्तक अतिशय तुटपुंज्या मोबदल्यावर काम करीत आहेत. त्यांना जानेवारीपासून केंद्राचा व मार्चपासून राज्याचा मोबदला मिळाला नाही. त्यामुळे आशा व गटप्रवर्तकांना मोठ्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा मोबदला तातडीने मिळावा तसेच इतर प्रलंबित मागण्यांचीही पूर्तता व्हावी, यासाठी आशा व गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मार्चा काढला. निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले. जिल्हा आशा वर्कर युनियनचे अध्यक्ष विजयाराणी पाटील, सचिव प्रियांका तावडे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चात वर्षा परब, मेघा परब, राजश्री पालेकर, राजश्री सावंत, उमा नाईक, सुमिता गवस, राधिका माळी, सानिया नारकर, धनश्री मांडवकर आदी सहभागी झाले.
----------------
आशा व गटप्रवर्तकांच्या प्रमुख मागण्या
* आरोग्य कर्मचारी म्हणून कायम करा
* दरमहा २६ व २८ हजार किमान वेतन द्या
* पेन्शन, ग्रॅच्युइटी, प्रोव्हिडंट फंड द्यावा
* चार महिन्यांचा थकीत मोबदला तात्काळ मिळावा
* कर्मचारी कामगार विरोधी श्रमसंहिता त्वरित मागे घ्या
* महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक रद्द करा
* राज्य सरकारचा मोबदला दरमहा पहिल्या आठवड्यात नियमित मिळावा
* विना मोबदला कोणतीही कामे सांगू नयेत