अलिबाग, ता. २० (वार्ताहर) ः वादळी वारा व पावसामुळे मच्छीमार बांधवांनी आपल्या बोटी किनारी आणल्या आहेत. शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या असून, पर्यटन हंगाम सुरू असला तरी बदलत्या वातावरणाचा फटका पर्यटन व्यवसायाला बसत असून, पर्यटकांची संख्या रोडावल्याचे स्थानिक व्यावसायिक सांगतात.
हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिल्यामुळे खोल समुद्रात गेलेल्या शेकडो मासेमारी नौका किनारी परतल्या आहेत. मासेमारी हंगामातील शेवटचे दिवस असून, जास्तीत जास्त मासळी पकडून नफा वाढवण्याच्या प्रयत्नात मच्छीमार होते. शेवटच्या टप्प्यासाठी आठ हजार किलोलिटर डिझेल कोटाही मंजूर झाला आहे. त्यामुळे मच्छीमारांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, परंतु वादळी हवामानामुळे मच्छीमारांचे शेवटचे तीन आठवडे फुकट जाणार आहेत. १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारीस बंदी असते. पावसाळ्यात समुद्र खवळत असल्याने बोटींना नुकसान होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर हा कालावधी मत्स्यजीवांच्या प्रजननाचा असतो. गतवर्षी पाऊस लांबल्यामुळे मासेमारी बंदीचा कालावधीही वाढवण्यात आला होता.
हवामान विभागाने वादळाची सूचना दिल्यानंतर काही मच्छीमारांनी मासेमारीस जाण्यास टाळले, तर यादरम्यान समुद्रात गेलेल्या अलिबाग, साखर आक्षी, बोडणी येथील नौका भरकटल्याने नुकसान झाले आहे.
पावसाळी वातावरणामुळे अलिबागमधील किनाऱ्यांवर येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. प्रशासनाकडून वॉटर स्पोर्ट्सलाही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे किनारी भागाकडे पर्यटकांनी संख्या कमी झाल्याने व्यावसायिक चिंतेत आहेत.
मासेमारीबंदीची अधिसूचना अद्याप आलेली नाही, परंतु नेहमीप्रमाणे १ जूनपासून मासेमारीबंदी होईल, हे सर्व मच्छीमारांना माहिती आहे. बंदी लागू झाल्यानंतर नौका बंदरात आणून सुरक्षित नांगरून ठेवत आहेत.
- संजय पाटील, सहाय्यक उपायुक्त, रायगड मत्स्य व्यवसाय विभाग