Unseasonal rains lashed Mumbai, Nashik and Pune
Marathi May 21, 2025 12:24 PM


मुंबई : कोकणापासून उत्तर महाराष्ट्र, मध्य-पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात आज (20 मे) अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरूच असल्याचे पाहायला मिळाले. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह नाशिक-पुण्यात वादळी वार्‍यांसह धो-धो पाऊस कोसळल्याने जागोजागी पाणी साचून नागरिकांचे चांगलेच हाल झाले. रत्नागिरीत आडवली येथे रेल्वे रुळांवर दरड कोसळल्याने कोकण रेल्वे ठप्प झाली आहे. रेल्वे सेवा सुरळीत करण्यासाठी दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. खरीप पेरणीपूर्वीच्या तयारीत असलेले शेतकरी शेतातील ओलावा सुकण्याची वाट पाहत आहेत. मात्र, मागील आठवडाभरापासून सलग जोरदार पाऊस होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. (Unseasonal rains lashed Mumbai, Nashik and Pune)

मागील आठवडाभरापासून मुंबई, नाशिक, पुण्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. 25 मे पर्यंत पूर्वमोसमी पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक असेल. कोकण किनारपट्टीला आज बुधवारी रेड अलर्ट तर, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला 2 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

हेही वाचा – MI VS DC : IMD च्या अलर्टने मुंबई इंडियन्सचा प्लेऑफचा प्रवास होईल खडतर, हार्दिकचं टेन्शन वाढलं

मुंबईत एवढ्या मिमी पावसाची नोंद

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत रात्री आठ वाजेपर्यंत पश्चिम उपनगर भागातील जोगेश्वरी येथे 63 मिमी, डोंगरी 57 मिमी, अंधेरी पूर्व 40 मिमी, मरोळ 29 मिमी, जुहू 24 मिमी, सांताक्रूझ 23 मिमी, विलेपार्ले 21 मिमी, खार 19 मिमी आणि दिंडोशी येथे 18 मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर पूर्व उपनगरातील पवई भागात 38 मिमी, भांडूप 29 मिमी, विक्रोळी 18 मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. मात्र शहर भागातील फोर्ट, कुलाबा, सीएसएमटी, परळ, दादर, भायखळा आदी भागातसुद्धा पावसाच्या सरी बरसल्या. मात्र या ठिकाणी किती पाऊस पडला याबाबतची माहिती पालिकेकडून उपलब्ध झालेली नाही.

केरळातही मान्सूनचे लवकर आगमन

याआधी भारतीय हवामान विभागाने 27 मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता. परंतु मान्सूनचे आगमन त्याआधीच म्हणजे 25 मे पर्यंतच मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर आठवडाभरातच कोकणात येण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा – ST Bus Accident : ब्रेक फेल झाल्याने एसटी बसने चौघांना उडवले; 2 ठार, तर दोघे गंभीर जखमी

Edited By Rohit Patil



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.