आयपीएल 2025 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या 12 सामन्यापैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना ड्रॉ झाल्याने एक गुण पदरात पडला. आरसीबी संघ 17 गुण आणि +0.482 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. आता उर्वरित दोन सामने सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स या संघांसोबत आहेत. जर हे दोन्ही सामने जिंकले तर आरसीबीचा संघ गुणतालिकेत टॉप 2 मध्ये राहील. 23 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि 27 मे रोजी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध सामने होणार आहे. असं असताना 27 मे पूर्वी संघात दिग्गज गोलंदाजाचं पुनरागमन होणार आहे. आरसीबीचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड उर्वरित सामन्यांसाठी भारतात परतणार आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या भीतीमुळे आयपीएल स्थगित झाल्यानंतर हेझलवूड मायदेशी गेला होता. तसेच दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात खांद्याला दुखापत झाल्याने हेझलवूड चेन्नईविरुद्धच्या सामन्यात खेळला नव्हता.
भारत पाकिस्तान तणावपूर्ण स्थितीत जोश हेझलवूड ऑस्ट्रेलियाला परतला आणि तिथेच उपचार सुरू केले. आता पूर्ण तंदुरुस्ती मिळवलेल्या आरसीबीच्या या वेगवान गोलंदाजाने सराव सुरू केला आहे. जोश हेझलवूड रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात पुढील रविवारी म्हणजेच 25 मे रोजी संघात सामील होणार असल्याची माहिती आहे. म्हणजेच जोश हेझलवूड 23 मे रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी देखील उपलब्ध नसेल. जर 25 मे रोजी आरसीबी संघात सामील झाला तर तो 27 मे रोजी लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात खेळू शकतो.
जोश हेझलवूडच्या पुनरागमनाच्या बातमीने आरसीबीच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. कारण यावेळी हेझलवूडने आरसीबीसाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाने 10 सामन्यांमध्ये 36.5 षटके टाकली आहेत आणि एकूण 18 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच जोश हेझलवूडने आरसीबीसाठी सर्वाधिक डॉट बॉल टाकले आहेत. त्याने 10 सामन्यांमध्ये एकूण 103 डॉट बॉल टाकले आहेत. त्यामुळे आरसीबीच्या विजयात हेझलवूडचा मोठा वाटा आहे. हेझलवूड प्लेऑफपूर्वी आरसीबी संघात सामील होणे निश्चितच चांगली बातमी असणार आहे. मागच्या 17 पर्वात आरसीबीला काही जेतेपद मिळवता आलं नाही. पण यंदा तशी शक्यता निर्माण झाल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.