आयपीएल स्पर्धेतील 64व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. या स्पर्धेतील लखनौ सुपर जायंट्सचं आव्हान संपुष्टात आलं आहे. मात्र औपचारिक सामन्यात विजय मिळवण्याची धडपड असेल. दुसरीकडे गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये जागा पक्की केली आहे. गुजरात टायटन्सन आतापर्यंत 12 सामने खेळले असून 9 सामन्यात विजय आणि तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. 18 गुण आणि +0.795 नेट रनरेटसह गुजरात टायटन्स संघ गुणतालिकेत टॉपला आहे. प्लेऑफचं गणित सुटलं असलं तरी टॉप 2 मध्ये राहण्यासाठी उर्वरित गणित सोडवणं गरजेचं आहे. त्यासाठी लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना जिंकणं आवश्यक आहे. कारण गुजरात टायटन्सने हा सामना गमावला तर टॉप 2 जागांसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्सला संधी मिळेल. कारण या दोन्ही संघांनी 12 सामन्यानंतर 17 गुण मिळवले आहेत. गुजरातने लखनौविरुद्धचा सामना गमावला आणि पंजाब-बंगळुरुने उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर टॉप दोन मध्ये जागा मिळवतील.
गुणतालिकेत टॉप 2 मध्ये असलेल्या संघाला दोन फायदे असतात. त्यामुळे गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्सची टॉप 2 साठी धडपड आहे. टॉप 2 मध्ये असलेल्या संघाला सर्वप्रथम क्वॉलिफायर 1 सामना खेळण्याची संधी मिळते. यात विजयी संघ थेट अंतिम फेरी गाठतो. तर पराभूत झालेल्या संघाला क्वॉलिफायर 2 मध्ये खेळण्याची संधी मिळते. एलिमिनेटर फेरीत म्हणजेच तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असलेल्या संघातील विजयी संघासोबत खेळण्याची संधी मिळते. त्यामुळे अंतिम फेरी गाठण्याची संधी टॉप 2 मध्ये असलेल्या संघांना सर्वाधिक असते. त्यामुळे टॉप 2 मध्ये जागा मिळवण्यासाठी धडपड असते.
गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ 6 वेळा आमनेसामने आले आहेत. यात गुजरात टायटन्सने 4, तर लखनौ सुपर जायंट्सने 2 वेळा विजय मिळवला आहे. गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध सर्वाधिक 227 धावांची खेळी केली आहे. तर लखनौ सुपर जायंट्सने गुजरातविरुद्ध सर्वाधिक 186 धावा केल्या आहेत. पण लखनौ सुपर जायंट्सने यंदाच्या स्पर्धेत गुजरात टायटन्सचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. त्यामुळे गुजरात टायटन्सला हा विजय वाटतो तितका सोपा नाही.