नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नॅशनल हेरॉल्डच्या माध्यमातून १४२ कोटी रुपये कमावल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी विशेष न्यायालयात केला.
उभय नेत्यांची कमाई ही गुन्हेगारी स्वरूपाची होती. त्यामुळे प्रथमदर्शनी त्यांच्याविरोधात हवाला प्रतिबंधक कायद्यातील विविध तरतुदींनुसार गुन्हा दाखल होऊ शकतो, असे ईडीकडून सांगण्यात आले.
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात मोठा गैरव्यवहार झाला असल्याचे सांगत भाजपचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी २०१४ मध्ये याचिका दाखल केली होती. त्यानंतर ईडीने २०२१ मध्ये या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली होती. ईडीने दोषारोपपत्राची प्रत स्वामी यांना द्यावी, असे निर्देश न्या. विशाल गोगने यांनी सुनावणी दरम्यान दिले.
‘‘नॅशनल हेरॉल्डच्या संपत्तीवर २०२३ मध्ये टाच आणली गेली होती. तोवर राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांसह अन्य आरोपी हे गुन्हेगारी उत्पन्नाचा लाभ घेत होते. गुन्हेगारी लाभ मिळवण्यापुरतेच हे प्रकरण मर्यादित नाही तर आरोपींनी पैसे स्वत:जवळ ठेवताना हवाला व्यवहाराचा वापर केला,’’ असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी सरकारची बाजू मांडताना सांगितले.
दरम्यान या प्रकरणात नकली भाडेकरार, आगाऊ भाड्याच्या स्वरूपात आणि जाहिरातींच्या माध्यमातून काँग्रेसच्या संबंधित नेत्यांनी मोठ्या प्रमाणात पैसा कमावल्याचा आरोप भाजपने केला आहे.
‘अनेकांचे पितळ उघड’‘‘तपासामध्ये अनेक राजकीय नेत्यांचे पितळ उघडे पडले. यात सोनिया गांधी, राहुल गांधी, ऑस्कर फर्नांडिस, स्व. मोतीलाल व्होरा यांचा तसेच यंग इंडियन कंपनीचा समावेश आहे. वरील सर्व आरोपींनी असोसिएटेड जर्नल्सशी संबंधित दोन हजार कोटी रुपयांची संपत्ती चुकीच्या मार्गाने अधिग्रहीत करत गुन्हेगारी प्रकाराने पैसा कमावला. सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे यंग इंडियन कंपनीचे समभागधारक असून दोघांकडे प्रत्येकी ३८ टक्के समभाग आहेत, असे राजू यांनी युक्तिवादात सांगितले.