सोलापूर : अनेक दिवसांपासून काँग्रेसमध्ये घुसमट होत असलेले व नाराज असलेले माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सात गुप्त बैठका झाल्यानंतर अखेर काँग्रेसची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ मे रोजी अक्कलकोट येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
चार वेळा आमदार, एकदा गृहराज्यमंत्री पद भूषविल्यानंतरही विधानसभा निवडणुकीत तीन वेळा पराभव झाल्याची सल त्यांच्या मनात होती. १९५७ पासून स्व. सातलिंगप्पा म्हेत्रे व त्यानंतर सिद्धाराम म्हेत्रे यांनी अक्कलकोट तालुक्यात काँग्रेसची धुरा सक्षमपणे सांभाळली होती. भाजपच्या आमदारांना वरिष्ठ पातळीवरून ज्या पद्धतीने ताकद दिली जाते, तशी साथ मिळत नसल्याचे दुखः अलीकडच्या काळात त्यांना होते. सत्ताबदल झाल्यानंतर त्यांना व कार्यकर्त्यांना त्रास होत असतानाही काँग्रेस पक्षाने साथ दिली नाही. २००९ पासून आपल्याकडे दुर्लक्ष झाले. त्यांच्या या व्यथेची काँग्रेस पक्षात दखल घेतली जात नव्हती. म्हणूनच शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हेत्रेंनी सांगितले.
महायुती म्हणून जुळवून घ्यावे लागेल : म्हेत्रेविद्यमान आमदारांशी आता महायुती म्हणून जुळवून घ्यावे लागेल. ''दुश्मन से दोस्ती हर हालात में अच्छी'' यासाठी एक पाऊल मागे घेत आहे. त्यानंतरही जर परिस्थितीत बदल झाला नाही तर पुन्हा संघर्ष करण्याची माझी तयारी आहे. माझा संघर्ष हा वैयक्तिक स्वार्थासाठी नाही तर लोकांसाठी आहे, असेही सिद्धाराम म्हेत्रे यांनी सांगितले.
म्हेत्रेंचे महायुतीत स्वागत : आमदार कल्याणशेट्टीसिद्धाराम म्हेत्रे यांचे महायुतीत स्वागत आहे. लोकांपासून लांब गेल्याने राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी ते पक्ष बदलत आहेत. अक्कलकोटमधील अवैध धंदे बंदच राहतील. त्यात तडजोड होणार नाही. मी म्हेत्रेंच्या तालमीत नाही तर भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्या तालमीत तयार झाल्याचा सूचक इशारा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी म्हेत्रेंना दिला.