आयपीएल 2025 स्पर्धेतील 63व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 59 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये मोठ्या दिमाखात एन्ट्री घेतली आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाचवेळा जेतेपद मिळवलं आहे. आता सहाव्यांदा जेतेपदाच्या शर्यतीत उतरला आहे. गुजरात टायटन्सने एकदा जेतेपदाला गवसणी घातली आहे. तर पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांची झोळी अजूनही रिती आहे. त्यामुळे आता जेतेपदासाठी चार संघात जबरदस्त चुरस असणार आहे. खासकरून प्लेऑफचे सामने सुरु होण्यापूर्वी टॉप 2 मध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपड आहे. तसं पाहीलं तर गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्सला टॉप 2 मध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. पण चौथ्या स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्सलाही तितकीच संधी आहे. कारण टॉप 3 संघांच्या तुलनेत मुंबई इंडियन्सचा नेट रनरेट चांगला आहे. आता फक्त एक विजय आणि काही समीकरणं जुळून आली तर आरामात टॉप 2 मध्ये स्थान मिळवेल. मुंबई इंडियन्सचा शेवटचा सामना पंजाब किंग्सविरुद्ध आहे. हा सामना मुंबईने जिंकला तर 18 गुण होतील. पण इतकं करूनही इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे. कसं काय ते समजून घ्या
गुजरात टायटन्सचे साखळी फेरीत दोन सामने शिल्लक आहेत. दोन पैकी दोन सामने जिंकले तर टॉप 2 मध्येच राहील. पण दोन्ही सामने गमावले तर मुंबई इंडियन्सला संधी मिळू शकते. दोघांचे समान 18 गुण राहतील आणि नेट रनरेटच्या जोरावर मुंबई इंडियन्स टॉप 2 मध्ये राहू शकतो. पण गुजरातने एक सामना जिंकला आणि एक गमावला तर मुंबईचं एक दार बंद होईल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचेही दोन सामने शिल्लक आहेत. दोन्ही सामन्यात पराभव झाला तर 17 च राहतील. मुंबई इंडियन्स 18 गुणांसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मागे टाकून पुढे जाईल. पण रॉयल चॅलेंजर्सने एक सामना जिंकला तर टॉप 2 मधील एक स्थान जाईल. त्यामुळे आरसीबीचा पराभव होणं हेच मुंबईच्या पथ्यावर पडणार आहे.
पंजाब किंग्सचे साखळी फेरीत दोन सामने आहेत. एक सामना मुंबई आणि दुसरा सामना दिल्लीशी होणार आहे. मुंबईला पराभूत करण्यात यश मिळवलं तर टॉप 2 मध्ये येणारच नाही. पण पराभव झाला तर मुंबईला संधी मिळेल. इतकंच काय तर दिल्लीविरुद्धचा सामना गमवला तर मुंबई पुढे निघून जाईल.
मुंबई इंडियन्सला टॉप 2 चं गणित सोडवण्यासाठी इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे. पंजाब किंग्सला पराभूत करण्याचं तेवढं मुंबईच्या हाती आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात टॉप 2 गणितही सुटेल.