ठाण्यात छत्री-रेनकोटच्या खरेदीला उधाण
मेच्या पावसामुळे विक्रेत्यांची चांदी
ठाणे, ता. २२ (बातमीदार)- मे महिन्याच्या सुरुवातीलाच ठाण्यात पावसाने दिलेली हजेरी नागरिकांसाठी थोडी अनपेक्षित ठरली असली, तरी स्थानिक व्यापाऱ्यांसाठी मात्र ती सुवर्णसंधी ठरली आहे. पावसाची चाहूल लागताच जांभळी नाका व गावदेवी परिसरातील छत्री आणि रेनकोट विक्रेत्यांच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. यावर्षी लवकर आलेल्या पावसामुळे विक्रीत मोठी उसळी आली असून, विविध प्रकारच्या आकर्षक व उपयुक्त छत्र्या-रेनकोटसह ऑनलाइन सेवांचाही लाभ ग्राहक घेऊ लागले आहेत.
यावर्षी पावसाचे आगमन लवकर झाल्याने रेनकोट व छत्र्यांची मागणी अचानक वाढली असून, काही दुकानांत साठा कमी पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अनेक दुकानदारांनी गेल्या वर्षीचा शिल्लक राहिलेला मालही विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे. यंदा माल आधीच मागवून साठवून ठेवला असल्याने सध्या तरी ग्राहकांची मागणी भागवता येत आहे, मात्र विक्रीचा वेग पाहता साठा लवकरच संपण्याची शक्यता असल्याचे मत काही व्यापारयांकडून व्यक्त करण्यात आले. बाजारात सध्या छत्र्या व रेनकोटचे विविध प्रकार ग्राहकांना आकर्षित करत आहेत. फोल्डिंग, स्टिक हँडल, विंडप्रूफ, कार्टून प्रिंट्ससह मुलांसाठीच्या छत्र्या, रंगीबेरंगी व ट्रान्सपरंट ऑटोमॅटिक छत्र्या यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. रेनकोटमध्ये जॅकेट स्टाइल, पोचो स्टाइल, बायसायकल रायडर्ससाठी डिझाइन केलेले रेनकोट, फॅशनेबल रेनकोट, मुलांसाठी हलके आणि आकर्षक रंगांचे रेनकोट उपलब्ध आहेत. जांभळी नाका परिसरातील काही दुकानांनी ग्राहकांसाठी ऑनलाइन ऑर्डर व डिलिव्हरीची सुविधादेखील सुरू केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑर्डर घेऊन काही दुकानदार घरपोच सेवा देत आहेत.
पावसाच्या आगमनापूर्वीच ठाण्यातील बाजारपेठांमध्ये रेनकोट आणि छत्र्यांच्या खरेदीने जोर धरल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हवामानातील बदल, लवकर आलेला पाऊस आणि ग्राहकांची वाढती सजगता लक्षात घेता यंदा विक्रीच्या आकड्यांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता छत्री-रेनकोट विक्रेत्यांकडून वर्तवली जात आहे.