गुजरात टायटन्सचं सहज टॉप 2 मध्ये राहण्याचं स्वप्न भंगलं आहे. कारण आता टॉप 2 स्थानाची शर्यत चुरशीची झाली आहे. आता गुजरात टायटन्स गुणतालिकेत टॉपला असली तरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्सला एक संधी अधिक आहे. आयपीएल 2025 स्पर्धेतील 64वा सामना गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात रंगला. हा सामना लखनौ सुपर जायंट्सने सहज जिंकला. लखनौचं प्लेऑफचं स्वप्न आधीचं भंगलं आहे. पण गुजरात टायटन्सच्या टॉप 2 मार्गात खोडा घातला आहे. लखनौ सुपर जायंटस्ने 20 षटकात 2 गडी गमवून 235 धावा केल्या आणि विजयासाठी 236 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान गाठताना शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी चांगली सुरुवात केली. मात्र त्यानंतर विकेट टप्प्याटप्प्याने पडल्या आणि विजयी धावांचं अंतर वाढलं. अखेर लखनौ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सचा 33 धावांनी पराभव केला. गुजरात टायटन्सने 20 षटकात 9 गडी गमवून 202 धावा केल्या.
या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा गुजरात टायटन्सच्या बाजूने लागला. गुजरात टायटन्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तिथेच फसगत झाली. लखनौ सुपर जायंट्सने गुजरातच्या गोलंदाजांची पिसं काढली. एडन मार्करम आणि मिचेल मार्श यांनी चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. त्यानंतर मिचेल मार्शचा झंझावात सुरु झाला. मिचेल मार्शने 64 चेंडूत 10 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 117 धावा केल्या. तर निकोलस पूरनने 24 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकार मारत नाबाद 56 धावा, तर ऋषभ पंतने 6 चेंडूत 2 चौकार मारत नाबाद 16 धावांची खेळी केली.
गुजरात टायटन्स संघ आतापर्यंत 13 सामने खेळला आहे. त्यापैकी 9 सामन्यात विजय आणि 4 सामने गमावले आहेत. सध्या 18 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. आता शेवटचा सामना जिंकला तर 20 होतील. गुजरात टायटन्सचं टॉप 2 चं गणित आता पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर अवलंबून असणार आहे. कारण या दोन्ही संघांचे स्पर्धेतील दोन सामने शिल्लक आहेत. गुणतालिकेत सध्या दोन्ही संघाचे 17 गुण आहेत आणि उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर 21 होतील. तसेच टॉप 2 मध्ये स्थान पक्कं होईल. त्यामुळे या दोन्ही संघापैकी निदान एकाने एक सामना गमवावा अशी प्रार्थना आता गुजरात टायटन्सचे चाहते करत आहेत.