Pahalgam Attack : पहलगामचे हल्लेखोर आहेत कुठे? काँग्रेस, प्रचारकी भाषण नव्हे इमानदार उत्तर हवे
esakal May 23, 2025 07:45 PM

नवी दिल्ली : ‘‘पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी कुठे आहेत, ते अजूनही भारतात आहेत की सीमेपलीकडे पळाले, अशी सवालांची फैर कॉँग्रेसने झाडली आहे. मोदी सरकार नेमके काय लपवू पाहत आहे? जनतेला प्रचारकी भाषण नव्हे तर इमानदार उत्तर हवे आहे, असा हल्लाबोल काँग्रेसच्या प्रवक्त्या व खासदार प्रणिती शिंदे यांनी आज केला.

काँग्रेस कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान, खासदार प्रणिती शिंदे यांनी आरोप केला की, मोदी सरकारने राष्ट्रीय सुरक्षा, मुत्सद्देगिरी आणि अंतर्गत स्थैर्य हा विषय केवळ पोकळ प्रचाराचे माध्यम बनविले आहे.

‘‘पहलगाममध्ये हल्ला करणारे चार दहशतवादी कुठे आहेत, सरकार त्यांना अद्याप का पकडू शकले नाही, त्यांच्या विरुद्ध काही कारवाई सुरू आहे काय?’’ असे सवाल खासदार शिंदे यांनी केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली होती की भारत पाकिस्तानचा संघर्ष त्यांच्यामुळेच थांबला आहे.

आज पुन्हा ट्रम्प यांनी याचा पुनरुच्चार केला आहे, असा टोला प्रणिती शिंदे यांनी लगावला. काँग्रेस पक्षाकडून सुरू असलेल्या, संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या तसेच पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बोलावण्याच्या मागणीचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

...तरी पंतप्रधान यांचे मौन ः रमेश

काँग्रेसचे माध्यम विभागाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही केंद्र सरकारला लक्ष्य केले. ११ दिवसांत ८ वेळा डोनाल्ड ट्रम्प यांनी संघर्ष विरामाचे श्रेय घेतले, आणि भारत-पाकची एकसमान पद्धतीने प्रशंसा करताना संघर्ष थांबविण्यासाठी व्यापार रोखणे हे प्रमुख हत्यार असल्याचेही म्हटले.

तरी पंतप्रधान मोदी यावर मौन बाळगून आहेत, असे रमेश म्हणाले. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी १८ महिन्यांपासून मुक्तपणे फिरत असल्याचा आरोप करताना जयराम रमेश यांनी केला आहे. ‘‘दहशतवाद्यांचे हे टोळके पूँचमध्ये डिसेंबर २०२३ मधील हल्ल्यात तसेच ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या गगनगीर आणि गुलमर्ग येथील हल्ल्यातही सहभागी होता,’’ अशी माहिती समोर आल्याचा दावा रमेश यांनी केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.