पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नवनवीन माहिती सध्या समोर येत आहे. वैष्णवीची मोठी जाऊ मयुरी हगवणे हिचादेखील सासरच्यांकडून छळ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे याबाबत मयुरीच्या आईने राज्य महिला आयोगाकडे पत्राद्वारे तक्रार केली होती, अशी माहिती आता समोर येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत खुलासा केला आहे. अंजली दमानिया यांनी एक्सवर (X) याबाबतचे पुरावे शेअर केले आहेत. दमानिया यांनी मयुरीची आई लता जगताप यांनी राज्य महिला आयोगाला पाठवलेल्या पत्राचे फोटो शेअर केले आहेत. हे पत्र मयुरीच्या आईकडून राज्य महिला आयोगाकडून ईमेल करण्यात आलं होतं. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी याबाबतचा ईमेल करण्यात आला होता. अंजली दमानिया यांनी या प्रकरणी राज्य महिला आयोगाला प्रश्न विचारले आहेत.
'महिला आयोग यावर काय स्पष्टीकरण देणार का? वैष्णवीचा जीव वाचला नसता का? वैष्णवीची जाऊ, मयूरी, हिने महिला आयोगाला ईमेल करून तिला मारहाण केली, तिच्या सासऱ्यांनी छाती जवळ हात लावून कपडे फाडले. शिवीगाळ केली, ह्याचे पुरावे, FIR, फोटो आणि तिच्या आईने लिहिलेली चिठ्ठी पाठवली. ती चिठ्ठी सुद्धा मी जोडत आहे. आमचा मेहुणा मोठा पोलीस अधिकारी आहे, आमच्या मागे मोठा राजकीय पाठिंबा आहे असा त्या चिठ्ठीमधे उल्लेख आहे. महिला आयोगाने यावर कारवाई का नाही केली? याचं उत्तर हवं आहे. वेळच्यावेळी ही कारवाई झाली असती तर आज वैष्णवी सुद्धा जिवंत असती', अशा शब्दांत अंजली दमानिया यांनी सुनावलं आहे.
पत्रात काय म्हटलंय?
'माझी मुलगी सौ. मयुरी सुशील हगवणे हिचे २० मे २०२२ रोजी श्री. सुशील राजेंद्र हगवणे (रा. भुकुम ता. मुळशी) यांच्याशी विवाह झाला. लग्नाच्या काही कालावधीनंतर तिचे सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे यांनी आम्हाला फॉरच्यूनर पाहीजे आणि पैसे पाहिजे अशा मोठ्या गाड्यांच्या आणि रोख रकमेची मागणी करुन तिला त्रास देऊ लागले. तिचे पती घरी नसताना ह्या घटना वारंवार घडत होत्या. नंतर तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांनी तिला मारहाण केली आणि सांगितलं की, तुला वडील नाहीत, तुझ्या अपंग भावास आणि आईस आम्ही मारुन टाकू. आमच्याकडे बंदुका आहेत. काही वाकडं करु शकत नाही. माझा मेहुणा मोठा पोलीस अधिकारी आहे. आमच्यामागे मोठा राजकीय पाठिंबा आहे. अशा प्रकारच्या धमक्या देऊन आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. तरीसुद्धा आम्ही सामंजस्याने हा वाद मिटवत होतो', असं मयुरीच्या आईने पत्रात म्हटलं आहे.
१८ फेब्रुवारी २०२४ रोजी पौड पोलीस स्टेशन तालुका मुळशी येथे तक्रार दाखल केली. पण त्यावेळी तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी समज देऊन मध्यस्थी केली. त्यानंतर सासू-सासरे तिच्या पतीकडे माझ्या मुलीला सोडण्याची वारंवार मागणी करु लागले. तिच्या पतीचा या गोष्टीला नकार असल्याने त्याचा राग मुलीवर काढत होते', असा आरोप मयुरीच्या आईने राज्य महिला आयोगाला पाठवलेल्या पत्रात केला होता.