सकाळ वृत्तसेवा
अकोला : अनेक दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाच्या अंतर्गत सुरू असलेला हुकूमशाहीचा वाद आता उफाळून आल्याचे पहायला मिळाले. शुक्रवारी दुपारी अकोल्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी एकजूट होऊन शिवसेना नेते, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना हटावचा नारा देत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
या संदर्भात शुक्रवारी सिव्हिल लाईन परिसरातील जिल्हा परिषद कर्मचारी भवनात निष्ठावंत शिवसैनिकांची आढावा बैठक संपन्न झाली. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख श्रीरंग दादा पिंजरकर यांच्या नेतृत्वात संपन्न झालेया या बैठकीत जिल्ह्यातील बहुतांश शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आढावा बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त करीत माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी पक्षाची कशी अपरिमित हानी केली हे अनेक उदाहरणे देऊ सांगितले.
पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतही बाजोरिया यांनी महायुतीच्या उमेदवाराला निवडून न येऊ देण्याचा चंग बांधून काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी शर्तीचे रान केले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्याचप्रमाणे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षांतर्गत पुनर्बांधणीसाठी अकोला जिल्ह्याला जो निधी दिला त्या निधीचा बाजोरिया यांनी दुरुपयोग करून स्वहित साधले.
त्याचप्रमाणे आपल्या खास मर्जीतील व्यक्तींनाच पक्षीय राजकारणची संधी देण्याच्या कुटील राजनीतीमुळे शिंदे गटाचे अस्तित्व जिल्ह्यात संपत असून यामुळे समस्त शिवसैनिक पेटून उठून भूखंड माफिया बाजोरिया यांना यापुढे बाजूला सारुन त्यांचा एककल्ली कारभार खपवुन घेतल्या जाणार नसून बाजोरिया यांना चलेजावाचा इशारा या सभेत देण्यात आला.
दरम्यान, कार्यकर्त्यांनी नेहरु पार्क परिसरात रस्त्यावर उतरून बाजूला यांच्या विरोधात निदर्शने करीत त्यांचा जाहीर पुतळा जाळून आपला रोष व्यक्त केला. यावेळी जिल्हाप्रमुख अश्विन नवले, शिंदे गटाचे माजी नगरसेवक शशीकांत चोपडे, अध्यक्ष योगेश अग्रवाल, महानगर अध्यक्ष रमेश गायकवाड एड पप्पू मोरवाल, निष्ठावंत कार्यकर्ते पावसाळे, राजू ठाकूर समवेत अनेकांनी आपले विचार मांडून बाजोरिया यांच्या कृत्याचा पाढा वाचून बाजोरिया यांच्या हुकूमशाही राजकारणावर टीका केली. या संदर्भात संपूर्ण जिल्ह्यातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाचे राष्ट्रीय नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेऊन त्यांना बाजोरिया यांच्या एककल्ली, हुकुमशाही व स्वार्थी राजकारणाची माहिती देणार असल्याचे एवढे सांगण्यात आले.