चोरलेल्या मोबाईलवरून तरुणाने रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा केला कॉल! पोलिसांचे 4 तास सर्च ऑपरेशन; अख्खे रेल्वे स्थानक पालथे घातले, पण बॉम्ब सापडलाच नाही
esakal May 24, 2025 08:45 AM

सोलापूर : येथील रेल्वे स्थानकावरून एका तरूणाने चोरलेल्या मोबाईलवरून दुपारी सव्वादोनच्या सुमारास ‘डायल ११२’वर कॉल करून स्थानकावर बॉम्ब असल्याचा कॉल केला. सदर बझार पोलिसांसह बॉम्बशोधक पथक, श्वान पथक, आरसीपी, रेल्वे, जीआरपी व स्थानिक पोलिस स्थानकावर दाखल झाले. दुपारी सव्वादोन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्यांनी अख्खे रेल्वे स्थानक पालथे घातले. पण, पोलिसांना काहीच हाती लागले नाही. आता तो मोबाईल बंद असल्याने कॉल नेमका कोणी केला, याचा तपास लागलेला नाही.

देशात युद्धजन्य स्थिती असल्याने दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल केले होते. त्यानंतर आज (ता. २३) एका तरूणाने चोरलेल्या मोबाईलवरून रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्यासंदर्भात कॉल करून पोलिसांचे टेन्शन वाढविले होते. ‘डायल ११२’वर केलेला कॉल सुरवातीला सलगर वस्ती पोलिसांना मिळाला, पण रेल्वे स्थानकाची हद्द सदर बझार पोलिसांची असल्याने तो कॉल तसाच संबंधिताना देण्यात आला. त्यानंतर शहर पोलिसांचे बॉम्ब शोधक पथक, श्वान पथकासह सर्वच यंत्रणा स्थानकावर पोचली.

पोलिसांनी स्थानकावरील सर्वांच्या बॅगा, वाहने पालथी घातली, तब्बल चार तास हे सर्च ऑपरेशन सुरू होते. त्यावेळी पोलिस उपायुक्त डॉ. दिपाली काळे, सहायक पोलिस आयुक्त राजन माने, सदर बझार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील, सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमाकांत शिंदे, पोलिस निरीक्षक श्री. ढवळे आदी अधिकारी त्याठिकाणी उपस्थित होते.

मोबाईल चोरीचा, फुटेजसाठी सोलापूर पोलिस पुण्याला रवाना

ज्यावेळी सोलापूर शहर पोलिसांना रेल्वे स्थानकावर बॉम्ब असल्याचा कॉल आला, त्यावेळी मोबाईलचे लोकेशन स्थानकावरील होते. त्यानंतर मोबाईल बंद केल्याने पुढील लोकेशन पोलिसांना समजू शकले नाही. दरम्यान, तो मोबाईल कोणाचा आहे? याचा शोध पोलिसांनी घेतला. त्यावेळी पुण्यातील एका अंध महिलेचा मोबाईल असल्याचे समजले. तिच्याकडे चौकशी केल्यावर एका तरुणाने गुरूवारी (ता. २२) मोबाईल चोरून नेल्याचे समोर आले. त्या अंध महिलेसोबत त्या दिवशी पुणे रेल्वे स्थानकावर कोणता तरूण होता, याचे फुटेज मिळविण्यासाठी सोलापूर शहर पोलिस पुण्याला रवाना झाले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.