राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवी हगवणे हिच्या वडिलांसह कुटुंबियांची भेट घेतली. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी खटला फास्ट ट्रॅकवर चालवावा यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं. कस्पटे कुटुंबाला न्याय देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही केस स्ट्राँग करण्याचा प्रयत्न असल्याचं अजित पवार म्हणाले. दरम्यान, या प्रकरणात हगवणेंचा नातेवाईक असलेल्या एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याच्या नावाचीही चर्चा सुरू होती. याबाबतही अजित पवार यांनी कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर स्पष्ट सांगितलं.
कस्पटे कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आय़पीएस अधिकारी असलेल्या जालिंदर सुपेकर यांच्याशी मी बोललो आहे. त्यांनी या प्रकरणाशी काही संबंध नाही असं मला सांगितलंय. तरीही मी त्यांना हे प्रकरण संवेदनशील असल्याचं सांगितलं आणि तुमच्या नावाची दबक्या आवाजात चर्चा होतेय. जर फोनचं कनेक्शन किंवा कुठून काही संबंध आढळला तर गय केली जाणार नाही असा दम अजित पवार यांनी आयपीएस सुपेकर यांना दिलाय.
आयपीएस अधिकारी असलेले जालिंदर सुपेकर हे पोलीस महानिरीक्षक आहेत. राजेंद्र हगवणे यांचे ते मेहुणे असून वैष्णवीचे मामे सासरे लागतात. हगवणेंची मोठी सून मयुरी यांच्या आईने राज्य महिला आयोगाला लिहिलेल्या पत्रात मोठ्या पोलीस अधिकाऱ्याचा उल्लेख केला होता. त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव सांगून हगवणे सुनांना धमकी देत होते असा आरोप त्या पत्रात होता.
500 कोटींच्या घोटाळ्याची चौकशीसामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्याबाबत धक्कादायक दावा केलाय. ५०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तर आयपीएस जालिंदर सुपेकर यांनी हगवणे हे दूरचे नातेवाईक असून माझा या प्रकरणात कसलाच संबंध नाही. कित्येक महिन्यांपासून संपर्क नसल्याचं सांगितलं. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी माझी भूमिका आहे असंही त्यांनी म्हटलं होतं.