इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत शुक्रवारी (२३ मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात होत आहे. लखनौमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये होत असलेल्या या सामन्यात बंगळुरू पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी, तर हैदराबाद प्रतिष्ठेसाठी खेळत आहे.
या सामन्यात इशान किशनने शानदार खेळ केला, पण त्याचे शतक थोडक्यात हुकले. पण त्याच्या खेळीच्या मदतीने हैदराबादने बंगळुरूसमोर २३२ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे.
या सामन्यात दुखापतग्रस्त रजत पाटिदारच्या जागेवर प्रभारी कर्णधारपद सांभाळणाऱ्या जितेश शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद प्रथम फलंदाजीसाठी उतरले.
पुनरागमन करणाऱ्या ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी सलामीला फलंदाजीला येत चांगली सुरुवात केली होती. त्यांनी आक्रमक खेळ केला होता. परंतु, चौथ्या षटकात अभिषेक शर्माला लुंगी एनगिडीने फिल सॉल्टच्या हातून झेलबाद केले. त्याने १७ चेंडूत ३४ धावा केल्या, त्यात ३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे.
त्याच्यापाठोपाठ पुढच्याच षटकात ट्रॅव्हिस हेडला भूवनेश्वर कुमारने रोमारियो शेफर्डच्या हातून झेलबाद करत माघारी धाडले. हेडने १० चेंडूत १७ धावा केल्या.
पण त्यानंतर इशान किशनआणि हेन्रिक क्लासेनची जोडी जमली. क्लासेन आक्रमक खेळत असताना इशानने त्याला साथ दिली होती. त्यांच्यात ४८ धावांची भागीदारी झाली. त्यांनी ९ षटकांच्या आतच संघाला १०० धावा पार करून दिल्या होत्या.
पण ९ व्या षटकात क्लासेनची विकेट सुयश शर्माने घेतली. त्याचा झेल रोमारियो शेफर्डनेच घेतला. क्लासेनने १३ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २४ धावा केल्या. त्याच्यानंतर अनिकेत वर्मानेही इशानला साथ दिली.
परंतु, वादळी खेळ करणाऱ्या अनिकेतला कृणालने १२ व्या षटकात बाद केले. त्याचा झेल भूवनेश्वर कुमारने घेतला. अनिकेतने ९ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकारांसह २६ धावा चोपल्या.
त्याच्यापोठापठ रोमारियो शेफर्डने कृणाल पांड्याच्या हातून नितीश कुमार रेड्डीला बाद केले. दरम्यान, इशानने एक बाजू सांभाळताना आक्रमक फटके खेळत २८ चेंडूत अर्धशतक करत शतकाकडे वाटचाल केली होती. अभिनव मनोहरलाही रोमारियो शेफर्डनेच फिल सॉल्टच्या हातून १२ धावांवर बाद केले.
त्यानंतर पॅट कमिन्सनेही इशानसोबत चांगली फलंदाजी केली. मात्र शेवटी इशानला शतकापर्यंत पोहचला आले नाही. २० षटकांनंतर तो ४८ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह ९४ धावांवर नाबाद राहिला. पॅट कमिन्स १ षटकारासह ६ चेंडूत १२ धावांवर नाबाद राहिला. २० षटकानंतर हैदराबादने ६ बाद २३१ धावा केल्या.
बंगळुरूकडून गोलंदाजी करताना रोमारियो शेफर्डने २ विकेट्स घेतल्या. तसेच भूवनेश्वर कुमार, लुंगी एनगिडी, सुयश शर्मा आणि कृणाल पांड्या यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.