नितीन बिनेकर - सकाळ वृत्तसेवा
मुंबई : मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी आणि लोकल प्रवासावरील ताण लक्षात घेता, राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी ‘वॉटर मेट्रो’ प्रकल्पाची तयारी सुरू केली आहे. डिसेंबर २०२६पासून ही सेवा सुरू होण्याची शक्यता असून प्रारंभी आठ मार्गांवर जलवाहतूक सेवा राबवली जाणार आहे. या प्रकल्पासाठी कोची वॉटर मेट्रोच्या यशस्वी मॉडेलचा आधार घेण्यात येत आहे.
सध्या प्रस्तावित मार्गांमध्ये नरिमन पॉइंट ते वांद्रे आणि वांद्रे ते वर्सोवा हे दोन महत्त्वाचे मार्ग असून, उर्वरित सहा मार्ग निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल सप्टेंबर २०२५पर्यंत सादर होणार आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर मुंबईतील समुद्री जलमार्गांवरून दररोज हजारो प्रवाशांना जलद आणि पर्यावरणपूरक प्रवास करता येणार आहे.
या प्रकल्पासाठी कोची मेट्रो रेल लिमिटेड (केएमआरएल) यांचे तांत्रिक सहकार्य घेतले जात आहे. कोचीतील वॉटर मेट्रो ही भारतातील पहिली जलवाहतूक सेवा असून, ती २०२३ मध्ये सुरू झाली आहे. कोची प्रकल्पाच्या यशामुळे तही जलवाहतुकीला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तपणे ही योजना आखली आहे.
वॉटर मेट्रोची वैशिष्ट्येकोची वॉटर मेट्रोची वैशिष्ट्ये उल्लेखनीय आहेत. सुमारे ७४७ कोटी रुपयांच्या खर्चाने उभारण्यात आलेल्या या प्रकल्पात ७८ हायब्रिड इलेक्ट्रिक बोटी आणि ३८ टर्मिनल्स तयार करण्यात येत आहेत. बोटीत एसी, वायफाय, सीसीटीव्ही आणि स्वयंचलित दरवाजे अशा सुविधा असून, कोची शिपयार्डमध्येच या बोटी तयार करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पासाठी जर्मन विकास बँकेकडून आर्थिक सहाय्य मिळाले आहे.
कॉमन कार्ड प्रणालीमुंबई वॉटर मेट्रोसाठीही इलेक्ट्रिक बोटी, एसी टर्मिनल्स, क्यूआर कोड तिकीट बुकिंग आणि मोबाइल अॅपद्वारे सेवा उपलब्ध होणार असल्याचे संकेत आहेत. तसेच कोचीप्रमाणेच कॉमन कार्ड प्रणाली राबवण्याचाही विचार सुरू आहे. त्यामुळे लोकल ट्रेन, बस आणि मेट्रोसह या सेवांचा एकत्रित वापर करता येईल.
संभाव्य मार्गनारंगी-खरवडेस्वरी, वसई-मीरा-भाईंदर, फाऊंटन जेट्टी-गायमुख-नागळे, कोळशेट-काल्हेर-मुंब्रा-कल्याण, कल्याण-मुंब्रा-मुलुंड-ऐरोली, वाशी-डॉमेस्टिक क्रूझ टर्मिनल (भाऊचा धक्का), गेटवे ऑफ इंडिया, मुलुंड-ऐरोली-डिसीटी-गेटवे, मिरा-भाईंदर-वसई-बोरिवली-नरिमन पॉइंट-मांडवा, बेलापूर-गेटवे-मांडवा, बोरिवली-गोराई-नरिमन पॉइंटसारखे संभाव्य मार्ग आहेत.