चिमुकल्याला विषारी सापाचा दंश
ठाणे, ता. २३ (बातमीदार) : वाडा तालुक्यातील सापणे गावात राहणाऱ्या तन्मय माळी या दोनवर्षीय बालकास सर्पदंश झाला. फुरसे जातीच्या सापाने त्याच्या उजव्या पायाला दंश केला. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
तन्मय गुरुवारी (ता. २२) रात्री त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या चुलत्याकडे गेला होता. तेथून रात्री साडेनऊच्या सुमारास घरी येत असताना घराच्या पायरीवर त्याला काहीतरी चावल्याचे त्याने आईला सांगितले. त्याच्या सांगण्यावरून त्याच्या वडिलांनी बाहेर पायरीवर पाहिले असता फुरसे जातीचा साप तिथे दिसला. वेळ न घालवता तन्मयला आरोग्य केंद्रात नेले. तेथे प्रथमोपचार करून त्याला ठाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.