पास्थळ येथील तरुणाच्या हत्येचा उलगडा
एका विधीसंघर्षित बालकासह सात आरोपींना अटक
तारापूर, ता. २३ (बातमीदार) ः तारापूर पोलिस ठाणे हद्दीतील पास्थळ येथे एका तरुणाच्या झालेल्या हत्येचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी तरुणाच्या हत्येप्रकरणी सात आरोपींना अटक केली आहे.
बोईसरजवळील पास्थळ येथील आंबट गोड मैदानात अभिषेक सिंह या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी (ता. १६) सकाळच्या सुमारास आढळून आला होता. डोक्यावर धारदार शस्त्राने वार करीत तरुणाची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी तारापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तारापूर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हत्या झालेल्या ठिकाणी भेट देऊन साक्षीदारांची चौकशी, परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली.
मद्यपान करताना मृत अभिषेक सिंह आणि आरोपी यांच्यात वादावादी झाल्याच्या कारणावरून रागाच्या भरात हत्या करण्यात आल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी एका विधीसंघर्षित बालकासह एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.