मुंबई : विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या धुळे येथील कथित लाच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लोकसभेच्या धर्तीवर चौकशी समिती स्थापन करण्यात येणार आहे. गेल्या २० वर्षांनंतर झालेल्या या प्रकारामुळे विधिमंडळ चांगलेच आक्रमक झाले असून ज्येष्ठ आमदारांची समिती नेमण्यात येणार आहे.
विधिमंडळावरील या आरोपाच्या संदर्भात विधान परिषद सभापती राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज चर्चा केली. हा प्रकार अत्यंत गंभीर असून यामुळे विधिमंडळाची इभ्रत धोक्यात येऊ शकते. यासाठी विधिमंडळाची शान कायम राहावी, यासाठी तातडीने कारवाई करण्यात आल्याचे सभापती राम शिंदे यांनी सांगितले.
लोकसभेत असे प्रकार घडल्यानंतर चौकशी समिती नेमण्यासाठी असलेली तरतूद आणि दोषींवर शिक्षेसाठी असलेली कारवाईची तरतूद याचा अभ्यास करूनच विधी मंडळाची समिती नेमण्यात येणार असल्याचे सभापती राम शिंदे यांनी सांगितले. विधिमंडळाच्या समितीच्या कामकाजावर संशय निर्माण करणारी ही घटना असल्याने तिचा गांभीर्याने विचार करूनच चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी ज्येष्ठ आमदारांची समिती नेमण्यात येणार आहे. समितीमध्ये निवृत्त न्यायाधीश तसेच निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचा समावेश करण्याबाबत विचार सुरु असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
येत्या दोन दिवसांत लोकसभेमध्ये अशा प्रकरणासंबंधी काही तरतुदी आहेत का, याचा अभ्यास करून समिती नेमण्यात येणार आहे. अशा प्रकरणामध्ये दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र त्याचबरोबर कायद्याची पळवाट काढून कोणी सुटता काम नये, यासाठी लोकसभेतील तरतुदीचा अभ्यास करण्यात येणार आहे.
- राम शिंदे, सभापती, विधानपरिषद