MSRTC : बस स्थानकांवर कोटींचे सीसीटीव्ही, बहिणींच्या सुरक्षेसाठी मुंबईत कमान कंट्रोल सेंटर
esakal May 24, 2025 01:45 PM

सोलापूर : स्वारगेट दुर्घटनेनंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ राज्यातील बस स्थानकांवरील ६३० ठिकाणी सहा हजार ३०० कॅमेरे लावणार आहे. त्यासाठी महामंडळाला राज्य सरकारने ११२ कोटी रुपये दिले आहेत. त्यातील १११ कोटी रुपयांमधून नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्याची पाच वर्षे देखभाल करण्याचे काम ‘टीसीआयएल’ कंपनीला देण्यात आले आहे.

राज्यात परिवहन महामंडळाचे २५१ आगार असून एकूण ३१ विभाग आहेत. दररोज महामंडळाच्या १६ हजार बसगाड्यांमधून अंदाजे २० लाख महिला प्रवास करतात. अजूनही बहुतेक बस स्थानकांवर ना महामंडळाचे सुरक्षारक्षक ना स्थानिक पोलिस आहेत. स्वारगेट दुर्घटनेनंतर महिला प्रवाशांसाठी सुमारे अडीच हजार महिला सुरक्षारक्षक नेमण्याचे ठरले, पण अजूनही त्यासंदर्भात निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षेसाठी स्थानकांवर दर्जेदार सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. सर्व स्थानकांवरील सीसीटीव्ही मुंबईतील परिवहनच्या कमान कंट्रोल सेंटरला जोडले जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील प्रत्येक स्थानकांवरील हालचाली राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील दिसणार आहेत. दरम्यान, सध्याचे सीसीटीव्ही सात वर्षांपूर्वीचे जुने असून त्याच्या देखभाल-दुरुस्तीसाठी दरवर्षी सुमारे दोन कोटींचा खर्च करावा लागत आहे. या कंपनीची दोन वर्षांची मुदतवाढ देखील संपुष्टात आली आहे. त्यामुळे या कॅमेऱ्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न आहे.

बसगाड्यांमध्ये ‘एआय’चा वापर

बसस्थानकांबरोबरच आता बसगाड्यांमध्ये देखील प्रवाशांची विशेषत: महिलांना सुरक्षित वाटावे म्हणून लांबपल्ल्याच्या गाड्यांमध्ये देखील सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत. त्यासाठी ‘एआय’चा वापर केला जाणार आहे. बस बंद जरी असली तरीदेखील आतील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू राहतील, अशी ती व्यवस्था असणार आहे. दरम्यान, गाड्यांमधील कॅमेऱ्यांसाठी महामंडळाने केंद्राकडे निर्भया फंडातून निधी मागितला आहे.

बस स्थानकांवरील सीसीटीव्हीची सद्य:स्थिती
  • सध्याचे सीसीटीव्ही - ३,९००

  • देखभालीवरील वार्षिक खर्च - २ कोटी

  • नव्याने बसविणारे सीसीटीव्ही - ६,३००

  • एकूण खर्च - १११ कोटी

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राज्यातील बस स्थानकांवर आता नव्याने सीसीटीव्ही लावले जाणार असून त्यासाठी १११ कोटींचे काम निविदा प्रक्रियेतून ‘टीसीआयएल’ कंपनीला मिळाले आहे. पाच वर्षे त्याची देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी त्या कंपनीवर राहणार आहे.

- वीरेंद्र कदम, महाव्यवस्थापक, माहिती व तंत्रज्ञान, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.