नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर’च्या अनुषंगाने केंद्र सरकारवर टीका करत असलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यावर आज पुन्हा एकदा शरसंधान साधले. ‘भारताला पाकिस्तानसोबत का जोडले गेले? पाकिस्तानची निंदा करण्यात भारताला एकाही देशाने का साथ दिली नाही? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मध्यस्थी करण्यास कोणी सांगितले?’, अशी प्रश्नांची सरबत्ती करत गांधी यांनी भारताचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे विफल ठरल्याचा आरोप केला आहे. जयशंकर यांना प्रश्न विचारत असताना गांधी यांनी त्यांचा उपहास ‘जेजे’ असा केला.
‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती पाकिस्तानला आधी देण्यात आली होती. त्यामुळे तो देश सावध झाला होता, असा आरोप करतानाच भारताची किती विमाने पडली, याची माहिती सरकारने दिली पाहिजे, असे गांधी यांनी काही दिवसांपूर्वी विचारले होते. तर दुसरीकडे एस. जयशंकर हे नव्या युगातले ‘जयचंद’ असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली होती. जयशंकर यांच्या मुलाखतीमधील काही दृश्ये राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर टाकली आहेत. ‘बोलताना जयशंकर का अडखळत आहे?’ असा सवालही त्यावर गांधी यांनी केला होता.
राहुल गांधींचे चरित्र भारतविरोधी...राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी गांधींचे चरित्र हे भारतविरोधी असल्याची टीका केली. ‘‘काँग्रेसच्या भ्रष्टाचारामुळे देशात एकही राफेल विमान आले नाही. भाजपच्या काळात ही विमाने आली. ऑपरेशन सिंदूरबाबत बेजबाबदार वक्तव्ये करत लष्कराचे मनोबल कमी करण्याचे काम गांधी करत आहेत. त्यांना ‘निशान ए पाकिस्तान’चा किताब दिला पाहिजे,’’ असे भाटिया म्हणाले.