पावसाने बायपास रस्ता वाहून गेल्याने गैरसोय
esakal May 24, 2025 04:45 AM

पावसाने बायपास रस्ता
वाहून गेल्याने गैरसोय
सावंतवाडी ः निरवडे-कोनापाल गावातील नेमळे गावच्या सीमेला लागून असलेल्या बांदिवडेकरवाडीचा संपर्क मुसळधार पावसामुळे तुटला आहे. नदीवरील कमकुवत बायपास रस्ता वाहून गेल्याने ग्रामस्थांचे, विशेषतः विद्यार्थी, मोलमजुरी करणारे, व्यावसायिक आणि कर्मचाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. निरवडे आणि नेमळे गावाला जोडणाऱ्या या रस्त्या दरम्यानच्या नदीवर फेब्रुवारीपासून पुलाचे बांधकाम सुरू होते. मात्र, ठेकेदाराने कामाचे गांभीर्य न ओळखता संथगतीने काम सुरू ठेवले. या कामाबाबत ग्रामस्थांनी संबंधित यंत्रणेला तोंडी सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. बुधवारी (ता.२१) झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीवर बनवलेला तात्पुरता पर्यायी रस्ता पूर्णपणे वाहून गेला, त्यामुळे बांदिवडेकरवाडीचा बाहेरील जगाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. यामुळे वाडीतील रहिवाशांना १ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी तब्बल १० किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या बांदिवडेकरवाडी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
------------------
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये
समुपदेशन, सुविधा केंद्र
मालवण ः दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शासकीय तंत्रनिकेतन, मालवण येथे प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया २० मेपासून सुरू झाली आहे. यानिमित्ताने महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सुविधा केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी सोडविणे, दस्तऐवजांची पडताळणी, आवश्यक ती माहिती व मदत या सुविधा केंद्राद्वारे पुरविण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार योग्य शाखा निवडता यावी तसेच प्रवेश प्रक्रियेबाबत अचूक माहिती मिळावी, यासाठी संस्थेमध्ये समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाचे महत्व, करिअरच्या संधी, अभ्यासक्रमातील संकल्पना यांची माहिती दिली जाणार आहे. ऑनलाईन प्रवेश नोंदणीसाठी मदत, दस्तऐवज स्कॅन व अपलोड करण्यास मदत, अभ्यासक्रम व शाखा निवडीसाठी मार्गदर्शन, शासकीय योजनांबद्दल माहिती (शिष्यवृत्ती, फी सवलत इत्यादी करिअर संधी व प्लेसमेंट संदर्भातील माहिती या केंद्राद्वारे देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व पालकांनी घ्यावा, अधिक माहितीसाठी प्रा. गोलतकर, डॉ. महाडिक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतन, मालवणचे प्राचार्य प्रकाश शिरहट्टी यांनी केले आहे.
----------------
अमली पदार्थविरोधी
न्हावेली येथे रॅली
सावंतवाडी ः येथील पोलिसांकडून न्हावेली येथे अमली पदार्थविरोधी रॅली काढण्यात आली. यात पोलिस अंमलदार दीपक दळवी, कॉन्स्टेबल नाईक, सरपंच अष्टविनायक धाऊसकर, पोलिसपाटील सावळाराम न्हावेलकर, वसंत न्हावेलकर, गजानन दळवी, सागर धाऊसकर, राजेश्वरी कालवणकर, सागर जाधव, आरती माळकर, निकिता परब, अनिता नाईक, आरती न्हावेलकर, काशिबाई नाईक, रिया सावळ, सुभद्रा न्हावेलकर, शुभांगी न्हावेलकर, वैशाली नाईक, संविता मेस्त्री, सुमन नाईक, राजन कालवणकर, अर्जुन जाधव, लिपिक विनायक आरोंदेकर उपस्थित होते.
---
कार्यक्रम स्थगितीची
माहिती न दिल्याने भूर्दंड
कणकवली ः जिल्हा प्रशासनातर्फे गुणवंतांचा तसेच शंभर दिवस कृती आराखड्यामध्ये यश प्राप्त केलेल्या अधिकारी, कार्यालयांचा सत्कार सभारंभ कार्यक्रम गुरुवारी (ता.२२) सिंधुदुर्गनगरी येथे करण्यात येणार होता. तशी माहितीही प्रशासनातर्फे प्रसारित करण्यात आली. मात्र, हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला. या स्थगित झालेल्या कार्यक्रमाची माहिती प्रसारित न केल्याने अनेकांना नाहक भुर्दंड पडला, याबद्दल अनेक विद्यार्थी, पालकांनी नाराजी व्यक्त केली.
----
कणकवली नायब
तहसीलदारपदी पंडित
कणकवली ः गेल्या काही कालावधीपासून रिक्त असलेल्या येथील प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदारपदी राजापूर येथील निवासी नायब तहसीलदार दीपाली पंडित यांची बदली करण्यात आली आहे. कणकवली येथील नायब तहसीलदारपद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.