नवी दिल्ली : भारतातील संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून ठराविक रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. ईपीएफओकडून पीएफ खात्यातील जमा असलेल्या रकमेवर दरवर्षी व्याज दिलं जातं. केंद्र सरकारनं आर्थिक वर्ष 2024-25 साठी ईपीएफओकडून शिफारस करण्यात आलेल्या 8.25 टक्के व्याज दराला मंजुरी दिली आहे. 2023-24 मध्ये देखील 8.25 टक्के व्याज पीएफ खातेदारांना देण्यात आलं होतं. या वर्षी व्याज दरात कपात किंवा वाढ करण्यात आलेली नाही.
EPFO ने 28 फेब्रुवारी 2024 ला आर्थिक वर्ष 2024-25 साठी वार्षिक व्याज दर 8.25 टक्के ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हा प्रस्ताव वित्त मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. वित्त मंत्रालयानं ईपीएफओच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. आता लवकरच व्याजाची रक्कम देशातील 7 कोटी पीएफ खातेदारांच्या पीएफ खात्यात जमा केली जाईल.
केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या माहितीनुसार हा निर्णय ईपीएफओच्या 237 व्या बैठकीत घेण्यात आला होता. या बैठकीचं अध्यक्षपद श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं होतं. हा व्याजदर बाजारातील इतर निश्चित उत्पन्न पर्यांयांपेक्षा चांगला मानला जातो. ज्यांना सेवानिवृत्तीनंतर सुरक्षित गुंतवणूक असावी असं वाटतं त्यांच्यासाठी ईपीएफओचा पर्याय चांगला आहे.
EPFO नं फेब्रुवारी 2024 मध्ये आर्थिक वर्ष 2023-24 साठी व्याजाचा दर 8.25 टक्के निश्चित केला होता. तर, 2022-23 मध्ये पीएफचा व्याजाचा दर 8.15 टक्के इतका होता. मात्र, 2021-22 मध्ये तो 8.10 टक्के होता. 2021-22 चा व्याजदर 1977-78 नंतरचा सर्वात कमी व्याज दर होता.
ईपीएफओशी जोडल्या जाणाऱ्या सदस्यांची संख्या सातत्यानं वाढत आहे. मार्च 2025 मध्ये 14.6 लाख नवे सदस्य ईपीएफओशी जोडले गेलेले आहेत. ज्यामध्ये अधिक लोक पहिल्यांदा पीएफ योजनेत आले आहेत. ईपीएफओच्या प्रचार प्रसारामुळं दर महिन्याला नव्यानं जोडल्या जाणाऱ्या सदस्यांची संख्या 2.03 टक्क्यांनी वाढलीय. तर, वार्षिक 0.98 टक्क्यांनी वाढली आहे.
ईपीएफ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील गुंतवणुकीमुळं कर बचत होते. तर, दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार केला असता यातून चांगला परतावा मिळतो. यामध्ये जोखीम देखील नाही. मुदत ठेव आणि बचत योजनांमधील गुंतवणुकीवरील व्याज दर कमी होत असताना ईपीएफओकडून दिलं जाणारं व्याज आकर्षक मानलं जातंय.
अधिक पाहा..